तुरंबव येथील शारदादेवी नवरात्रोत्सवाला २२ सप्टेंबरपासून प्रारंभ !




 चिपळूण : चिपळूण तालुक्यातील तुरंबव  गावचे ग्रामदैवत, महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शारदादेवी नवरात्रोत्सवाला 22 सप्टेंबर पासून प्रारंभ होणार आहे.  संततीप्राप्तीसाठी नवसाला पावणारी तुरंबवचे ग्रामदैवत श्री शारदा देवी असे  भाविकांमध्ये विशेष श्रद्धा असून महाराष्ट्रासह, अन्य राज्यातूनही श्रद्धेने, भक्ती भावाने भाविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनाला येत असतात.

मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे गावापासून १२ किलोमीटर निसर्गरम्य तुरंबव हे देवस्थान आहे. नवरात्रातील पहिल्या माळेनंतर येथे शारदोत्सवाची सुरुवात याप्रमाणे होते. २२ सप्टेंबर : रुप्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, सायं.६ ते रात्रौ ११ दर्शन, रात्री ९ वाजता महाआरती, १०.३० ते ११.३० पारंपरिक जाखडी नृत्य, त्यानंतर  नवसाची सुरुवात. २३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर : दररोज सकाळी ८ ते रात्रौ ११ देवीचं दर्शन, रात्री ९ वाजता महाआरती, १०.३० वाजता जाखडी नृत्य आणि ११.३० पासून संतती नवस करणे व फेडणे. संततीसाठी नवस करणारे भाविक ट्रस्टकडून उपलब्ध ओटी साहित्य घेऊन पहाटे ५ वाजेपर्यंत नवस पार पाडतात. 

रात्री ११.३० नंतर गाभाऱ्यात प्रवेश बंद असला तरी मुखदर्शनाची सोय ठेवण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. महामंडळाने चिपळूण-तुरंबव आणि सावर्डे-तुरंबव या मार्गांवर विशेष बसफेऱ्या ठेवल्या आहेत. कोकण रेल्वेने येणाऱ्यांनी सावर्डे स्थानकावर उतरावे, गाडीचा थांबा नसेल तर चिपळूण येथे उतरून रस्त्याने यावे. यात्रेदरम्यान परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, राहण्याची सोय आहे. भाविकांना उत्तम दर्शन व्हावे, कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी श्री शारदा देवी मंदिर चॅरिटी ट्रस्ट व ग्रामस्थांचे उत्तम नियोजन असून अधिक माहितीसाठी ७७२००७५१९२ / ७७९६४७५१९२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या