१६ ऑगस्ट २०२५, मुंबई – संत झेवियर्स कॉलेजचा प्रतिष्ठित वार्षिक उत्सव मल्हार २०२५ दोन दिवस चाललेल्या रंगतदार स्पर्धा, कार्यशाळा, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स आणि कॅम्पसभर चाललेल्या उपक्रमांनंतर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कला, संवाद आणि सहभाग यांचा संगम घडवून आणत मल्हारने पुन्हा एकदा महाविद्यालयीन संस्कृतीतील उत्साहाचे दर्शन घडवले.
या दोन दिवसांत विविध स्पर्धा, प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या कार्यशाळा, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांसोबतच सुरक्षेच्या कडक व्यवस्था करण्यात आल्या होत्या. विद्यार्थी आणि प्रेक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मल्हारच्या उत्साही वातावरणाला अधिक रंगत आणली.
मल्हार २०२५ च्या कॉनक्लेव्ह सत्रांमध्ये कायदा आणि शासन यावर सखोल चर्चा घडून आल्या. माननीय न्यायमूर्ती रेवती मोहिते–दरे यांनी मुख्य भाषण करताना विशाखा मार्गदर्शक तत्त्वे, २०१३ चा कार्यस्थळी लैंगिक छळविरोधी कायदा, तसेच ट्रान्सजेंडर हक्क कायदा यांसारख्या महत्वाच्या विधेयकांनी समाजपरिवर्तनाची साधने म्हणून कशी भूमिका बजावली यावर प्रभावी भाष्य केले. त्यांच्या विचारांमध्ये या वर्षीच्या लहर – आजची तरंग, उद्याचा क्रांतीसूर या संकल्पनेचा प्रत्यय आला.
सांसद सुप्रिया सुळे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. “लोकशाहीत प्रत्येक मताला महत्त्व आहे” असे सांगत त्यांनी वन नेशन, वन इलेक्शन संकल्पना, तसेच मिजोराम आणि जम्मू–काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट यासंबंधी मुद्द्यांवर चर्चा केली. “आपण येथे सहमतीसाठी नव्हे, तर मतभेद व्यक्त करण्यासाठी आलो आहोत,” असे म्हणत त्यांनी मुक्त वाद–संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. कॉनक्लेव्हचे सत्र अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या उर्जावान संवादाने संपन्न झाले, ज्याचे सूत्रसंचालन बॉलीवूड हंगामाचे सी ई ओ यांनी केले.
उत्सवाचा समारोप महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या धमाकेदार संगीत मैफलीने झाला. डीजे राजीव यांनी लोकप्रिय गाण्यांच्या रिमिक्सने रंगत वाढवली, त्यानंतर चा़र दिवारी आणि त्यांच्या बँडने ‘झाग’, ‘क्या’ आणि सर्वांना भुरळ घालणारे ‘फरेबी’ या गाण्यांवर प्रेक्षकांना अक्षरशः थिरकायला लावले. त्यानंतर झालेल्या बक्षीस समारंभात सीसी टर्मिनस विभागाने एकूणच विजेतेपद पटकावले. शेवटी मल्हार २०२५ चा आफ्टरमूव्ही प्रदर्शित झाला, ज्यामध्ये चार महिन्यांची तयारी आणि तीन दिवसांचा अविस्मरणीय प्रवास टिपण्यात आला होता.
कला, संगीत आणि विचारांची सांगड घालत मल्हार २०२५ ने विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी आठवणी दिल्या आणि भारतातील अग्रगण्य महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव म्हणून आपली ओळख पुन्हा अधोरेखित केली.



0 टिप्पण्या