*आमदार तुकाराम कातेंच्या
प्रश्नाला सरकारचे उत्तर
मुंबई- गेल्या ५० वर्षांपासून चेंबूरच्या घाटला गाव खारदेवनगर
येथील महापालिकेच्या वसाहतीत बैठ्या चाळीत राहणार्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता हक्काचे घर मिळणार आहे. याठिकाणच्या रहिवाशांना परिसरातील एसआरए प्रकल्पात घरे मिळणार आहेत.तसेच त्यांची पालिकेकडून रखडलेली सर्व देणी दिली जाणार आहेत. स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी विधानसभेत उपस्थितीत केलेल्या लक्षवेधी सूचनेला सरकारच्यावतीने दिलेल्या उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.
आमदार तुकाराम काते यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करताना म्हटले की,चेंबूरच्या घाटला येथील पालिका वसाहत संक्रमण छावणीत गेल्या ४५ वर्षांपासुन शेकडो चतुर्थश्रेणी कर्मचारी राहत आहेत.परंतु त्यांनी ही निवासस्थाने खाली न केल्याने पालिकेने त्यांची सेवानिवृत्तीनंतरची भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी व इतर देणी रोखून ठेवली आहेत. १९८९ मध्ये या कर्मचार्यांना ही घरे मालकी तत्वावर देण्याचा ठराव झाला होता.परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.
या लक्षवेधीला सरकारच्यावतीने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लेखी उत्तर दिले. त्यात त्यांनी म्हटले की, याठिकाणी वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी न्यू खारदेवनगर गृहनिर्माण संस्था स्थापन करून परिसरातील एसआरए योजनेत सहभागी होण्याची मागणी केली होती. तसेच त्याबाबत उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती.यावर न्यायालयाने 'सेवानिवासस्थान' अशी नोंद करून एसआरए योजनेचे परिशिष्ट २ तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे आता या रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
0 टिप्पण्या