चेंबूरकरांच्या आंदोलनाचा दणका पालिका नवे शौचालय उभारणार

 


चेंबूरकरांच्या आंदोलनाचा दणका पालिका नवे शौचालय  उभारणार


मुंबई- चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील खारदेवनगर येथील अनंत मित्र मंडळाजवळचे  सार्वजनिक शौचालय पालिकेने तोडल्याने  दुरवस्था झाली आहे. तब्बल तीन वर्षांपासुन पालिका त्याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी अरविंद व नागेश पाटीलवाडी स्थानिक कृती समितीच्या माध्यमातुन एम पालिका कार्यालयावर नुकताच 'टमरेल मोर्चा' काढला. या आंदोलनाच्या  दणक्याने हादरलेल्या पालिका प्रशासनाने अखेर येत्या १५  दिवसांत नव्याने शौचालय बांधण्याचे लेखी आश्वासन दिले.


अरविंद व नागेश पाटीलवाडी स्थानिक कृती समितीचे अध्यक्ष दिनेश चिंदरकर यांच्या नेतृत्वाखाली हा 'टमरेल मोर्चा' काढण्यात आला.

या मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते आणि स्थानिक जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.यावेळी मोर्चेकऱ्यांच्या पालिका विरोधी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

एम पालिका कार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यावर कृती समितीच्यावतीने सहाय्यक आयुक्त शंकर भोसले यांना मागण्यांचे निवेदन दिले.त्यानंतर  त्यांनी येत्या १० ते १५ दिवसांत वरिष्ठांची मंजुरी  घेऊन सध्या तोडण्यात आलेल्या शौचालयाच्या जागेवर नव्याने शौचालय बांधले जाईल, असे लेखी आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या