नेरुळ येथे चित्र प्रदर्शनाचे आयोजन

 


नेरुळ येथे चित्र प्रदर्शनाचे आयोजन 


 नवी मुंबई : सुभाष हांडे देशमुख 


नवी मुंबई : नेरुळ जेष्ठ नागरिक संघाचे, नेरुळ जेष्ठ नागरिक ग्रंथालयात नेरुळ मधील काही प्रथितयश चित्रकारांच्या चित्रकृतीचे प्रदर्शन दिनांक २९ मार्च २०२५ रोजी भरविण्यात आले. चित्रकारीतेत  ज्यांनी दिगंत कीर्ती संपादन केली ते जागतिक कीर्तीचे चित्रकार शंकर सोनवणे यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. डॉ. प्रशांत किंजवडेकर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. प्रसंगी ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर, रणजीत दीक्षित, फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, सुरेश पोटे, लेखक गजानन म्हात्रे, सौ. शारदा अडसूळ, सौ. स्वाती फडके, दत्तात्रय आंब्रे, विजय सावंत आदि  मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात सर्वश्री सर्जेराव कुईगडे,  शिवशरण, वसंत राव, उल्हास सावंत,  जगदीश कर्जेकर, शशिकांत पाटील, अँथनी डिसोजा आदी चित्रकारांनी यात भाग घेतला. शाल व पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. श्री राम कृष्ण नेत्रालय यांनीही गिफ्ट देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. 


सरस्वती वंदनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमात प्रास्ताविकात प्रभाकर गुमास्ते यांनी रुग्णसेवेसारख्या अनेक समाज उपयोगी उपक्रमांची माहिती करुन दिली. अरविंद वाळवेकर यांनी आपल्या प्रसंगोचित भाषणात प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व चित्रकलाकारांना शुभेच्छा दिल्या. 


 डॉ. प्रशांत किंजवडेकर यांनी आपल्या मनोगतात विविध ज्ञानशाखा आणि चित्रकारी तेसारख्या कला यातून होणाऱ्या सामाजिक अभिसरण, त्या अनुरोधाने आपल्या ग्रंथालयाकडून होणारे अनमोल सामाजिक योगदान यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. 


शंकर सोनवणे यांनी आपल्या भाषणात त्यांचा चित्रकरितेतील प्रवास उलगडून दाखवताना देश विदेशात झालेली त्यांची असंख्य चित्रप्रदर्शने याबाबतची माहिती देऊन या प्रदर्शनात भाग घेणाऱ्या सर्व चित्रकारांचे अभिनंदन केले. 


या प्रदर्शनासाठी विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील अनेक विद्यार्थी, मान्यवरांनी या प्रदर्शनात भेट देऊन सहभाग दर्शविला. 

-----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या