दिवाळीनिमित्त फराळ, भेटवस्तू वाटप आणि ब्रेल पुस्तकाचे प्रकाशन



पनवेल : युथ कौन्सिल, नेरुळ आणि गजानन महाराज भक्त मंडळ वाशी या दोन समाजसेवी संस्थांच्या विद्यमाने २७ ऑक्टोबर रोजी पनवेल येथील नेरे मधील शांतीवनमधे असणाऱ्या कुष्ठरोग निवारण समिती केंद्रातील इस्पितळात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना दिवाळी फराळ, भेटवस्तू, अन्नधान्य तसेच औषधी चीजवस्तूंचे वितरण करण्यात आले. याचवेळी पत्रकार राजेंद्र घरत लिखित ‘जत्रांचे दिवस' या लेखाचे  ब्रेल रुपांतर असलेल्या पु्‌स्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. शिवव्याख्याते रवींद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर अक्षर रचनाकार विलास समेळ, पत्रकार राजेंद्र घरत, जेष्ठ नागरिक संघ नेरुळ चे आर्थिक सल्लागार विकास साठे, कवी दिलीप जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते.




   १२२ एकरात सेवाकार्य चालवल्या जाणाऱ्या या केंद्रात कुष्ठरोगावर उपचार घेणारी २८ कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. गेली ३७ वर्षे ठाणे, रायगड जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात मदतकार्य करुन तसेच वृक्षारोपणाच्या माध्यमातून हिरवाई निर्माण करणाऱ्या युथ कौन्सिल नेरुळने गेल्या काही वर्षांपासून दिवाळीच्या आधी काही दिवस या केंद्रात जाऊन तेथील रुग्णांची दिवाळी गोड करण्याचा वसा घेतला असून त्यांना गजानन महाराज भक्त मंडळाने सार्थ साथ दिली आहे. यंदा नवी मुंबईतील शिव व्याख्याते व ‘कविता डॉट कॉम'चे निर्मिती सूत्रधार प्रा. रवींद्र पाटील, अक्षरसुलेखनकार विलास समेळ यांच्यासमवेत या दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी शांतीवनच्या या केंद्रात या रुग्णांसमवेत काही क्षण व्यतीत केले व त्यांचे मनोगतही जाणून घेतले. पत्रकार राजेंद्र घरत यांचे ब्रेल लिपीतील २६ वे पुस्तक ‘जत्रांचे दिवस' प्रकाशित करताना एकेकाळी जत्रा व त्याठिकाणचे वातावरण हे सध्याच्या मॉलपेक्षाही भारी असे व ग्रामसंस्कृतीतील सर्वांनाच हवे ते त्या जत्रांनिमित्त तेथे लागलेल्या बाजारातून आबालवृध्दांना प्राप्त होई असे सांगून प्रा. पाटील यांनी युथ कौन्सिल, नेरुळ व गजानन महाराज भक्त मंडळ यांनी अविरतपणे चालवलेल्या सेवाकार्याचाही गौरव आपल्या भाषणातून केला. साठी-सत्तरी ओलांडलेले या दोन्ही संस्थांचे सदस्य आज हे काम करीत आहेत, त्यांची धुरा आता नव्या पिढीच्या शिलेदारांनीही आपल्या खांद्यावर घ्यायला हवी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. राजेंद्र घरत यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी या दोन्ही संस्थांनी स्वतःहुन पुढाकार घेतल्याबद्दल कृतज्ञतेची भावना आपल्या भाषणातून मांडताना तुम्ही आम्ही जत्रांचा आनंद घेतो; अंध मुलामुलींना ते सारे पाहता येणार नाही, मग निदान त्यांना ती अनुभूती स्पर्शाने वाचायच्या लिपीतून तरी देता यावी म्हणून हे पुस्तक ब्रेल लिपीत प्रकाशित केल्याचे आपल्या भाषणातून सांगितले. 



    या संपूर्ण कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन युथ कौन्सिल नेरुळचे सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी केले. प्रसंगी प्रा. रवींद्र पाटील यांचा सन्मानपत्र, शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर युथ कौन्सिल नेरूळची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभाही तेथे पार पडली.  या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वितेसाठी रमेश सुर्वे, शिवाजी शिंदे, अशोक महाजन, विक्रम राम, सुरजीत सिंग उभी, दत्ताराम आंब्रे, रवींद्र कांबळे, अंकुश शिंदे, चंद्रसेन कांबळे, यशवंत गोनेवाड, जी आर पाटील, नरेश विचारे, नाना पाटील, सुर्यंकांत गावडे, सुरेश वाघ, आर. एस. नाईक आदिंनी परिश्रम घेतले.

------------------------------------

प्रेषक :

सुभाष हांडे देशमुख

 नेरूळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या