सुभाष हांडे देशमुख समाज भूषण पुरस्काराने सन्मानित






नवी मुंबई :  राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगती करिता सातत्याने समाजाभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांचे कोल्हापूर येथील दसरा चौक मधील शाहू महाराज स्मारक भवन येथे आमदार सतेज पाटील व राज्यातील तसेच जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी,  सदर पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी राज योगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा दीदींच्या समाजसेवेतील अतुलनीय कार्याबद्दल त्यांचा जाहीर नागरी सत्कारही करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून राष्ट्रीय स्तरावरील समाजभूषण पुरस्कार सुभाष हांडे देशमुख यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात आला. 



महाराष्ट्र गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या पुढाकाराने नियोजन पूर्वक  उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात,  समाज हितासाठी विविध क्षेत्रात सातत्याने भरीव काम करणाऱ्या  राज्यस्तरीय ३९ तर राष्ट्रीय पातळीवरील ३२ गुणवंतांचा सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल,  गुच्छ  देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी मान्यवरांसह राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे सर्व जिल्हा अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते. 



उपस्थितांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील यांनी गुणवंत कामगार असोसिएशनच्या कार्याचा गौरव करुन सांगितले की, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी यांचा नागरी सत्कार आणि नोकरी,  कुटुंब सांभाळून सेवानिवृत्तीनंतरही समाजाच्या विविध स्तरावर अविरपणे भरीव काम करत असलेले गुणवंत कामगार यांचा सत्कार म्हणजे  भक्ती योग आणि कर्मयोग यांचा सुवर्णसंगम आहे. देश प्रेम,  देश निष्ठा दाखविणारा हा कार्यक्रम आहे.  सत्कार हे निमित्त असते यातूनच काम करावयास ऊर्जा मिळते.  ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी सर्वांचं कौतुक करुन म्हणाल्या की आजचा हा भावस्पर्शी पारिवारिक सोहळा आहे. ईश्वराला गुणवंताची गरज आहे आणि आपण गुणवंत आहात. आपला सन्मान होतो आहे ही आनंदाची बाब आहे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा कार्यक्रम आहे.

------------------------------------

प्रेषक :

गणेश हिरवे 

पत्रकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या