नवी मुंबई : नेरुळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील प्रांगणात सकाळच्या थंडगार अशा प्रसन्न वातावरणात, हिरव्यागार अशा लॉनवर, गार्डन परिवारातील ज्येष्ठ नागरिक श्री. प्रभाकरराव मिठबावकर यांचा ६५ वा वाढदिवस समारंभ आणि याबरोबरच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र यांच्यातर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील समाजभूषण पुरस्कार - २०२४ श्री. सुभाष हांडे देशमुख यांना जाहीर झाल्याने त्यांचाही यथोचित गौरव मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी गार्डन परिवारातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. गार्डन परिवारातील बहुसंख्य जेष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन, दोघांनाही सदिच्छा आणि आशीर्वाद देऊन त्यांना निरोगी असे दीर्घायुष्य लाभो अशा भावना व्यक्त केल्या. आजच्या दिवशी, अनंत चतुर्दशी हा पवित्र आणि शुभ असा दिन असल्याने कार्यक्रम अधिक अधोरेखित झाला.
गार्डन परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य श्री. सुभाष हांडे देशमुख यांना राष्ट्रीय स्तरावरील समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचाही यथोचित गौरव सर्व ज्येष्ठांनी मोठ्या अभिमानाने या प्रसंगी केला. आणि त्यांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नेरुळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन परिवार यांच्या माध्यमातून, सर्वश्री रामचंद्र पाटील, जयेश भावसार, शशी जोशी, किरण तामसे, महादेव जाधव आदींनी आयोजित केलेल्या या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रमेश पै यांनी कुशलतेने केले.
----------------------------------
प्रेषक :
---- सुभाष हांडे देशमुख
गार्डन परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य.
नेरुळ, नवी मुंबई
0 टिप्पण्या