प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज भालचंद्र ऊर्फ जे.बी. जोशी यांना रसायन तंत्रज्ञान संस्था- आयसीटी (मुंबई - जालना – भुवनेश्वर) या नामवंत रसायनअभियांत्रिकी समूह संस्थेचे कुलपती म्हणून महाराष्ट्र शासनाने नियुक्त केले आहे. यापूर्वी २००४ ते २०२४ अशी वीस वर्षे डॉ. रघुनाथ माशेलकर हे कुलपती होते.
मसूरसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या प्रा. जे. बी. जोशी यांनी आयसीटीतून (तत्कालीन युडीसीटी) रसायन अभियांत्रिकीचे पीएचडीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन तेथेच त्यांनी ३७वर्षे अध्यापनाचे काम केले. त्यांच्या या कारकिर्दीतील शेवटची दहा वर्षे ते संस्थेचे संचालक होते. या काळात त्यांनी संस्थेला स्वायत्तता मिळवून तर दिलीच, पण संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळवून देऊन पूर्वीचे नाव युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी- युडीसीटी) होते ते इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी) केले. या काळात त्यांनी कोट्यावधी रुपयांची अनुदाने व देणग्या मिळवून नवनवीन अभ्यासक्रम सुरु केले, इमारती बांधल्या, भाभा अणु संशोधन केंद्राबरोबर सामंजस्य करार करत अनेक संशोधन प्रकल्प हाती घेऊन संस्थेत चैतन्य निर्माण केले. प्रा. जे. बी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर ११६ विद्यार्थ्यांनी पीएचडी केली असून त्यातील बहुतांश विषय समाजाचे प्रश्न सोडवणारे आहेत. उद्योगधंद्यांचे प्रश्न तर ते सातत्याने सोडवत असतातच. पद्मभूषण पुरस्काराशिवाय प्रा. जे. बी. जोशी यांना अनेक देशी-परदेशी पुरस्कार मिळाले आहेत.
गेली दहा वर्षे ते मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष असून तेथेही संशोधन प्रकल्प, विज्ञान एकांकिका, इत्यादींसारखे नवनवे उपक्रम सुरु केले आहेत. नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केलेल्या प्रा. जे. बी. जोशींच्या उत्साहाला आयसीटी चे कुलपतीपद हे नवीन झळाळी देणारे ठरणार आहे.


0 टिप्पण्या