‘वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट’चे वारीत वैद्यकीय पथकाचे पंढरपूरकडे प्रस्थान


(सूत्रसंचालन विश्वस्त-सचिव सुरेश मानकुमरे, डावीकडून महेंद्र बनकर - अध्यक्ष कुर्ला नागरीक बँक, शंकरराव भणगे - उद्योगपती, दिलीप मोरे - उद्योजक, शाखाप्रमुख कुर्ला, डॉ. नितीन मणियार - मॅनेजिंग ट्रस्टी समर्पण ब्लड सेंटर, डॉ. अविनाश सुपे - निवृत्त अधिष्ठाता केईएम्‌ रुग्णालय, आमदार मंगेश कुडाळकर - प्रक्ष प्रतोद, विभागप्रमुख शिवसेना, संस्थेचे अध्यक्ष विजय कासुर्डे, उपाध्यक्ष ॲड. दादासाहेब खरमाटे, रमेश भुतेकर देशमुख - संचालक शालिनी सहकारी बँक, ई.वाय. जगताप - संचालक ज्ञानदीप सहकारी पतसंस्था.)


मुंबई : ‘वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई’ या संस्थेचा पंढरपूरच्या आषाढीवारीसाठी वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. (दि. २९ जून २०२४ रोजी कुर्ला (पूर्व), मुंबई येथून) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. अविनाश सुपे, निवृत्त अधिष्ठाता, केईएम्‌ रुग्णालय, प्रमुख पाहुणे आमदार मंगेश कुडाळकर, तसेच मान्यवरांमध्ये सर्वश्री आर.एम्‌. हगिर, डॉ. नितीन मणियार, चंद्रकांत ढमाळ, दिलीप मोरे, शंकरराव भणगे, महेंद्र बनकर, रमेश भुतेकर देशमुख, ई.वाय. जगताप, संस्थेचे मुखपत्र ‘खरा वैष्णव’चे संपादक डॉ. नरेंद्र कदम, संस्थेचे अध्यक्ष विजय कासुर्डे, उपाध्यक्ष ॲड. दादासाहेब खरमाटे उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव सुरेश मानकुमरे यांनी केले. प्रभाकर कोंबेकर यांनी आभार मानले. मान्यवरांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या आषाढी व कार्तिकीवारीत वैद्यकीय सेवा देणाऱ्या अलौकिक कार्याचा गौरव केला. या वारीत संस्थेचे २५० कार्यकर्ते व डॉक्टर रुग्णवाहिका, औषधांच्या ट्रकसह वैद्यकीय सेवा देतात. वारीत १८ दिवस ४ पथके निघतात. हे संस्थेचे ३१वे वर्ष असून १९९३ साली संस्थेतर्फे पहिली वारी वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुरू झाली. आजपर्यंत हे कार्य अखंडपणे सुरू आहे.


याप्रसंगी संस्थेला महाराष्ट्र स्टेट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ. नितीन मणियार यांनी धनादेश दिला. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., मुंबई व कोटक महेंद्र इन्शुरन्स कंपनी लि., मुंबई यांनी संस्थेला दिलेल्या अद्ययावत दोन्ही रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला. बहुसंख्य डॉक्टर व कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श डॉक्टर व सेवेकरी पुरुष, महिला यांना ‘वैष्णव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी भक्तिगीतांचा कार्यक्रम होता. शेवटी डॉ. राम पंडित, सतिश सिंग्रेकर यांच्या अभंग व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या