कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेचा महत्वपूर्ण निर्णय
( आनंद गायकवाड )
कल्याण - ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रहाणाऱ्या आणि ६० वर्षाहून अधिक वय असणाऱ्या सर्व जेष्ठ महिला - पुरुषांना विनामुल्य परिवहन सेवा देण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिकेने जाहीर केला असुन या मध्ये सरसकट सर्व महिलांना प्रवास भाड्या मध्ये ५० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे . या महत्वपूर्ण निर्णयाची अंमल बजावणी आज रात्री १२ वाजेपासुत त्वरीत अमलात येणार आहे . या पुढे कल्याण डोंबिवली महापालिकेतही
'कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित अर्थात KMPML या प्राधिकरणाच्या स्थापनेस शासनाची मंजूरी दिली आहे .
कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित म्हणजेच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपुर महानगरपालिका आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापुर नगरपरिषद यांच्या एकत्रित सहभागामधून सदर क्षेत्राकरीता प्राधिकरण करुन, त्याठिकाणी सार्वजनिक वाहतुक सुरु करण्यासाठी कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (KMPML) या अभिनामाची कंपनी स्थापन करण्यास शासनाने दि. १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयान्वये मंजूरी दिली आहे.
या शासन निर्णयाच्या अनुषंगाने पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) च्या धर्तीवर कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (KMPML) स्थापन करण्यात आले असून, गठीत संचालक मंडळाची पहिली बैठक १५ मार्च २०२४ रोजी महापालिका आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या अध्यक्षतेखाली (दूरदृश्य प्रणालीद्वारे) आयुक्त दालनात संपन्न झाली. या संचालक मंडळात वरील नमूद महानगरपालिका व नगरपरिषद यांचे महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, मुख्याधिकारी, आरटीओ, एमएमआरडीए चे प्रतिनिधी, सीआयआरटी पुणेचे संचालक यांचा अंतर्भाव राहील.
आजच्या बैठकीस उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजिज शेख, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य, कुळगाव-बदलापुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत तसेच आरटीओ प्रतिनिधी कदम उपस्थित होते. सदर बैठकीत कल्याण महानगर परिवहन महामंडळ मर्यादित (KMPML) च्या संपूर्ण रचना व कार्यपध्दतीबाबत संचालक मंडळाला माहिती देण्यात आली व या मंडळामार्फत पुढील नियोजन व धोरणात्मक निर्णय घेणेबाबत निश्चित करण्यात आले. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या सर्व बसेस मधून आज रात्री १२.०० वाजल्यापासून ज्येष्ठ नागरीकांना (वय वर्ष ६० व त्यापुढील) १०० % (विनामुल्य) प्रवास सवलत व महिलांसाठी प्रवास भाडे दरात ५० % सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे .
या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरीकांना व तमाम महिला वर्गाला परिवहन सेवेच्या सवलतीचा लाभ घेता येईल.


0 टिप्पण्या