जागतिक पांढरी काठी दिनी ब्रेल लिपीतील दोन पुस्तके प्रकाशित
प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख:
नवी मुंबई : वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून नेरुळच्या ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात दिनांक १५ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई महापालिकेच्या सचिव सौ. चित्रा विजय बाविस्कर लिखित ‘चला फुलांच्या बागेत' व ‘हसा मुलांनो हसा' या ब्रेल लिपीतील सातव्या व आठव्या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राम नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले. मंडणगड, जि. रत्नागिरी येथील स्नेहज्योती अंध निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा प्रणव सेनगुप्ता यांनी ही पुस्तके ब्रेलमध्ये रुपांतरीत केली आहेत.
या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना प्रा. डॉ. नेमाडे म्हणाले की महापालिकेच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून साहित्य सेवा बजावणं, लहानग्यांच्या भावना जपत त्यांना हसण्यासाठी प्रवृत्त करणारं लिखाण करणं ही बाब अवघड असताना सौ. बाविस्कर यांनी ते काम केलं हे प्रशंसनीय आहे. विचारमंचावर यावेळी उपस्थित असलेले पत्रकार राजेंद्र घरत यांनी ब्रेल लिपीबद्दल सविस्तर माहिती दिली व ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक संघाचे ग्रंथालय आणि यूथकौन्सिल नेरुळ या समाजसेवी संस्थांनी अशा प्रकारच्या पुस्तकांच्या प्रकाशनासाठी कार्यक्रमाचं यजमानपद स्विकारलं याबद्दल या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. 'ज्येष्ठ नागरिक संघ-नेरूळ' चे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी सौ. बाविस्कर यांनी इतक्या चांगल्या व सामाजिक बांधिलकीच्या, अंधांप्रति सहानुभुती दाखवणाऱ्या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेची निवड केल्याबद्दल मनोगतातून समाधान व्यवत केले. डॉ. अशोक पाटील यांनी एकूणच आयोजन व पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांची प्रशंसा केली. इतक्या कमी अवधीत चांगले आयोजन व नियोजन करुन हा कार्यक्रम घडवून आणल्याने प्रभावित झाल्याची भावना ब्रेल पुस्तकांच्या लेखिका सौ. चित्रा बाविस्कर यांनी व्यक्त करुन या संस्थांच्या विधायक कार्याच्या पाठीशी राहु आणि याहीपुढे विविध कार्यक्रमात सहभागी होऊ असे आपल्या मनोगतात नमूद केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'ज्येष्ठ नागरिक संघा'चे उपाध्यक्ष प्रभाकर गुमास्ते आणि 'यूथ कौन्सिल-नेरुळ' चे सचिव सुभाष हांडेदेशमुख यांनी केले. यावेळी रणजित दिक्षित, दीपक दिघे, विकास साठे, प्रकाश लखापते, अजय माढेकर, सौ. रजनी कलोसे, दिलीप चिंचोळे, सुरेश वाघ हेही सभागृहात उपस्थित होते.
0 टिप्पण्या