भांडुप येथील श्री नवयुवक को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.
मुंबई (प्रतिनिधी) भांडुप पूर्व येथील सन १९६७ मध्ये स्थापन झालेल्या श्री नवयुवक हरिजन उत्थापन को-ऑपरेटिव हाउसिंग सोसायटीची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कांजूरमार्ग अशोक नगर येथील दत्त मंदिर हॉल सभागृहात संस्थेचे प्राधिकृत अधिकारी राजेंद्र सहदेव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व प्राधिकृत मंडळाचे सदस्य प्रभाकर जाधव, प्रकाश पगारे, एल बी प्रसाद , वैशाली अडसूळ यांच्या उपस्थितीत पार पडली.
श्री नवयुवक हाउसिंग सोसायटीच्या 56 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन 2021 - 22 व सन 2022 - 23 या आर्थिक वर्षाचे ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक, तसेच सन 2021 - 22 व सन 2022 - 23 च्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालास मंजुरी घेण्यात आली. तसेच वारसा हक्क व नवीन खरेदी दाराच्या नावे सदनिका हस्तांतरित करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आले. नवीन सुरक्षा रक्षक एजन्सीची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून बीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे आलेल्या नोटीसीचे वाचन करून नवीन ठेकेदारांची नेमणूक करण्यासंबंधी विचारविनिमय करण्याचा ठराव मांडण्यात आला. तसेच मासिक देखभाल शुल्कात वाढ करण्यासंबंधी ठराव मांडण्यात आला, सन 2023 - 24 या वर्षाकरिता वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यात आली. तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये दलित सभासद 80 टक्के व जनरल सभासद 20 टक्के, 80 : 20 हे प्रमाण राखण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच इमारतीच्या दुरुस्ती बाबतचा ठरावावर विचार विनिमय करण्यात आल्याचेही प्राधिकृत अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले. शेवटी उपस्थित सभासदांचे आभार मानून अल्पोपहार झाल्यानंतर सभेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली, सभेला ज्येष्ठ पत्रकार व गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे तसेच बहुसंख्येने सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
0 टिप्पण्या