कृतार्थ जीवन जगलेला ... माणसातला माणूस.. रमेश पै

  रमेश पै  


स्वातंत्र्योत्तर काळात समाज जीवन विविध स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण रीतीने बदलत गेले. त्याच काळात आपले राष्ट्र उभे राहण्यामागील प्रेरणा,  त्याच्या उभारणीसाठी करावा लागलेला जमिनीवरचा  व मूल्यांचा संघर्ष यातूनच पुढे विचारांना एक संदर्भ चौकट असणारी पिढी तयार होत गेली. समाज अधिक प्रगल्भपणे राहावा,  तो सर्व स्तरावर उन्नत व्हावा या दृष्टीने अनेक विचारवंतांनी,  समाजधुरीणांनी युवा घडवले. जागरूक पिढी तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यातीलच,  त्या समकालीन परिस्थितीत विकसित झालेले एक व्यक्तिमत्व म्हणजे रमेश पै.


होय ! रमेश विष्णुपंत पै. वय वर्ष ७३ पूर्ण करुन अमृत महोत्सवी वर्षाकडे यशस्वीपणे वाटचाल करत असलेले रमेश पै.  खानदानी छटा असलेली गोरी उंच शरीरयष्टी, विनयशील व विनम्र स्वभाव,  शिस्तबद्ध पद्धतीने जीवन व्यतीत करणारे आणि वेळेचे भान ठेवणारे व चेहऱ्यावर सतत समाधान आणि हसरेपण जोपासणारे रमेश पै.  या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे नेरुळ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन परिवारातील सदस्यांसाठी ते एक आदरयुक्त असे आदर्शवत व्यक्तिमत्व ठरले आहे यात नवल नाही.


कर्नाटक राज्यातील उत्तर कानडा येथील कारवार मध्ये जन्म झालेले रमेश पै यांचे पदवी (बी.ए.) पर्यंतचे शिक्षणही तेथेच झाले. तीन भाऊ आणि सहा बहिणी असं  एकत्रित मोठ्या व संस्कृत कुटुंबात त्यांचं बालपण गेल्याने लहानपणापासूनच त्यांच्यावर चांगले संस्कार परिवारातूनच होत गेले. त्यात वडील विष्णू पै स्वातंत्र्यसैनिक होते त्यामुळे त्यांच्या सुसंस्कृत मनाला समाज हिताच्या जाणिवेचे वलय तर मिळालंच त्याचबरोबर त्याप्रती अधिक बळ मिळत गेलं. सहाजिकच समाजातील गरजूंना वेळोवेळी मदत करणं,  त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे वंचितांना मदतीचा हात देणं हे बाळकडू लहानपणापासूनच त्यांना मिळत गेल्याने एक वैचारिक व्यासपीठ त्यांना लाभलं व ते पुढे पुढे अधिक  दृढ होत गेलं. आणि मग नोकरी करताना,  व्यवसाय करताना त्याची व्याप्ती अधिक वाढतच गेली.  विस्तारित होत गेली. असं सांगताना रमेश पै अस म्हणतात की माझे वडील बंधू श्री.  दयानंद पै यांचे मार्गदर्शन व पाठबळ मला सतत मिळत गेलं. आमच्या एवढ्या मोठ्या कुटुंबाचे आधारवड तेच आहेत हे ही ते विनयान स्पष्ट करतात.


निर्यात विभागातील खासगी कंपनीत सुमारे दहा वर्षे नोकरी आणि नंतर व्यवसाय करत असताना सामाजिक क्षेत्रात विविध स्तरावर ते कार्यरत होते.  पण हा सर्व व्याप सांभाळून कुटुंबाकडेही त्यांनी दुर्लक्ष होऊ दिले नाही. आपल्या मुलांना त्यांनी सर्व अर्थाने सबळ बनविले. आज मुलगा प्रसाद आणि सुनबाई स्वाती दोघेही मायक्रोसॉफ्ट कंपनी सीएटल (यूएसए)  मध्ये कार्यरत आहेत. आपल्या स्वतःच्या पायावर ते सक्षमपणे उभे आहेत. तसेच कुटुंबातील सर्वच सदस्य चांगल्या पदावर कार्यरत असून नामांकित संस्थांमध्ये क्रियाशील आहेत. या सर्वांच्या पाठबळाने मी व माझी पत्नी आम्हा उभयतांना जगातील १८ देशांचा प्रवास करण्याचा, ते जवळून पाहण्याचा सुवर्णयोग जुळून आला असे ते अभिमानाने सांगतात. अर्थातच या आपल्या यशस्वी कृतार्थ जीवनाचं यश सांगताना आपली पत्नी सौ. मुक्ता हिनेही स्वतः पदवीधर असून देखील नोकरी न करता कुटुंबाचा भार आनंदाने सांभाळला. योग्य तऱ्हेने तिने सर्वांची देखभाल केली आणि मलाही प्रत्येक क्षणी वेळोवेळी मनापासून साथ दिली म्हणूनच मी सर्व स्तरावर काम करुन जीवनात यशस्वी ठरलो.  हे रमेश पै प्रामाणिकपणे सांगतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात.


असं म्हटलं जातं की काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात अजिबात नसतात. दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसे कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात याचे उत्कृष्ट म्हणजे रमेश पै. आज वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या पूर्वसंधेला ते तेवढ्याच ठामपणे समाधानाने उभे आहेत.  त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. म्हणूनच त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो. त्यांना दीर्घ असे निरोगी आयुष्य लाभो ही याप्रसंगी ईश्वरचरणी प्रार्थना!

जीवेत शरदः शतम्


सुभाष हांडे देशमुख

           नेरुळ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या