आदर्श शिक्षक श्री.संदीप परब यांना "महापौर पुरस्कार" जाहीर...
मुंबई, दि. ०६ - मागील २६ वर्षे अखंडित आणि प्रामाणिकपणे शैक्षणिक कार्य करणारे आदर्श शिक्षक श्री.संदीप धाकू परब यांना शैक्षणिक वर्ष - २०२२-२३ या वर्षातील बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा मानाचा सर्वोच्च असा " महापौर पुरस्कार " जाहीर करण्यात आला आहे.
यावर्षी मनपा शाळा व खाजगी अनुदानित शाळांतील एकूण १४७ शिक्षकांनी महापौर पुरस्कारासाठी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी मनपाचे ३८ व खाजगी शाळांचे १२ शिक्षक अशा एकूण ५० शिक्षकांची मनपाकडून या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून लवकरच महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा महापौर पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करून या सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
सन -१९९७ पासून भांडुप पश्चिमेकडील बॅ. नाथ पै विद्यालयात आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात करणारे श्री. संदीप परब यांनी १७ वर्षे या विद्यालयात प्रामाणिकपणे कार्य केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व शाळेच्या उन्नतीसाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. पुढे पटसंख्या कमी झाल्यामुळे ते अतिरिक्त होऊन घाटकोपर पूर्वेकडील शिशु विकास प्राथमिक विद्यालय येथे त्यांचे समायोजन झाले. तिथेही त्यांनी ०७ वर्षे अविरत सेवा केली. परंतु तिथेही पटसंख्या कमी झाल्यामुळे सद्यस्थितीत घाटकोपर पंतनगर येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्यालयात ते आता कार्यरत आहेत.
श्री. संदीप परब हे प्रामाणिक असून उत्तम तंत्रस्नेही शिक्षक आहेत. त्यांचे शैक्षणिक सामाजिक व संघटनात्मक कार्य अतिशय उत्तम आहे. मनाने प्रेमळ, सुस्वभावी, शांत व संयमी आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांची अचूक जाण असून त्यासाठी ते सतत झटत असतात. N.S.T विभागात त्यांचे विशेष वर्चस्व आहे. लाॅकडाऊन काळातील त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे.
विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्याशी त्यांचे नाते आदराचे व आपुलकीचे असून समाजात त्यांना आदराचे स्थान आहे.
अशा आदर्श शिक्षकाला महापौर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समस्त शिक्षक व कर्मचारी वर्गातून त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी वर्ग, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक यासर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

.jpeg)

0 टिप्पण्या