घे निरोप शेवटचा...

  

(दि. ३ आॅगस्ट२०२३ रोजी. निसर्ग व रानकवी ना. धों. महानोरांनी आपली इहलोकीची यात्रा संपवून वैकुंठाची वाट धरली. त्यांना हा शेवटचा निरोप... )


 घे निरोप शेवटचा... 


रानकवी नामदेवा, म्या पामरे काय तुझे गीत गावे

तू मातीत रुजविली कविता, ते गुपित तुजला ठावे ||१||


तू पाहता नभाकडे तुज साठी जलद ओथंबून येती

त्वा गाळल्या घामातून जोंधळ्याला लगडती मोती ||२||


पळसखेडा शिवारी, तू फळांच्या  उभारल्या बागा

हाडाचा तू तर शेतकरी,कष्टाचा परी न केला त्रागा ||३||


वृक्ष-लता, गुरे-पाखरे सारे, तू मानलेस सगे-सोयरे

तुझ्या अंगणात दाणा-पाणी, राखिली सदा सोय रे ||४||


तू लिहिले मनातले-जनातले,केली न कुणाची पर्वा

केली न मनाशी प्रतारणा, तू मनाचा कवी सर्वेसर्वा ||५||


अजंठा पाषाणावर,तू कोरली कवितेची नवी लेणी

तू जपली लोकसंस्कृती, लोकरंजनाची दिली देणी ||६||


पाहून स्त्री-जीवनातील वेणा,तू प्रार्थिलेस दयाघना

अत्याचाराचे घाव लागले जिव्हारी,जागली करुणा ||७||


तव शब्दाशब्दांतून दरवळतो मातीचा कोवळा गंध

त्वा केलीस अत्तर पेरणी,दरवळला त्यातूनि सुगंध ||८||


तुझे बोलणे- गाणे, ऋग्वेदाच्या होत्या सहज ऋचा

कवितेतून बोधविले तू जना,हाचि धर्म महाकवीचा ||९||


अवचित सोडुनि गेलास, अंधारले सारे काव्याकाश

परि तव कविता-गीतातून लाभेल जगा, नव प्रकाश ||१०||


जा मुक्त पाखरा,कर मुक्त विहार वैकुंठाच्या दरबारी

घे शेवटचा निरोप अमुचा,परी ये परतून याच भूवरी ||११||


© प्रा. डॉ.राम नेमाडे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या