राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची शासनाकडे मागणी
प्रतिनिधी (नवी मुंबई) सुभाष हांडे देशमुख:
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्यावतीने १९७९ पासून राज्यातील नोंदीत कामगारांना त्यांच्या सर्व क्षेत्रातील कार्याच्या अनुषंगाने गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन गौरविले जाते. हे सर्व गुणवंत कामगार आपणही समाजाचे कांहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने, समाजाप्रती निष्ठा जोपासत सातत्याने भरीव कार्य करीत असतात.
महाराष्ट्र शासनाच्या इतर विविध महामंडळाच्या पुरस्कार्थींना त्या विभागाच्यावतीने राज्य परिवहन महामंडळाची प्रवास, आरोग्य विषयक, विश्रामगृह सुविधा अशा अनेक सुविधांचा लाभ दिला जातो. मात्र शासनाच्या कामगार विभागाच्यावतीने गुणवंत कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधेचा लाभ दिला जात नाही. तरीसुद्धा हे गुणवंत कामगार सातत्याने व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शासनास सर्वतोपरी सहकार्य करीत असतात.
राज्याचे विविध विभाग त्यांच्या पुरस्कार्थींना सर्व सोयी सुविधा देत असतील तर, कामगार विभागाच्यावतीने सुद्धा या सुविधा गुणवंत कामगारांना मिळणे आवश्यक आहे. ज्या अनुषंगाने गुणवंतांच्या सातत्यपूर्ण कार्यात आणखी भर पडेल तसेच भरीव समाजकार्य व देशसेवा घडून येईल.
यासाठीच चालू अधिवेशनामध्ये राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या मागणीनुसार, कामगार मंत्री सुरेश खाडे, हे त्यांनी वारंवार दिलेल्या आश्वासनाप्रमाणे निश्चितच गुणवंत कामगारांना विविध सोयी सवलतीचा लाभ देणेकरीता धोरणात्मक निर्णय घेतील व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना समाजसेवेसाठी प्रोत्साहन सहकार्य देतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या निर्णयाची राज्यातील सर्व गुणवंत कामगार आतुरतेने वाट पहात आहेत.
असे महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी मंत्री महोदय यांना पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे.
0 टिप्पण्या