हेमंत सामंत यांच्या हस्ते संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन



डोंबिवली (गुरुदत्त वाकदेकर) : 'श्री डोंबिवली मित्र मंडळ' या डोंबिवलीतील गुर्जर बांधवांच्या सर्वात जुन्या सामाजिक संस्थेने चालवलेल्या 'श्रीमती देविकाबेन कल्याणजी विरजी छेडा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स' या महाविद्यालयाच्या नव्या अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन आज (१३ जानेवारी २०२३) प्रा. हेमंत सुधाकर सामंत (ब्रिटिश कौन्सिल शालेय राजदूत) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ख्यातनाम दाते मोनजीभाई शहा यांची विशेष उपस्थिती होती. यानिमित्ताने गेल्या वर्षभरात विविध विषयात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.


"शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीचा आलेख कायमच चढता रहावा. सर्वांना कायम चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देता यावे. जगाच्या पाठीवर कुठेही या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्यासाठी ह्या संगणक विषयात प्रावीण्य मिळवणे गरजेचे आहे. विद्यार्थी दशेतच संगणक शिकायला मिळाल्यामुळे पुढील जीवनात त्यांना त्याचा खूप उपयोग होईल. म्हणूनच ह्या संगणक प्रयोगशाळेचे महत्व अनन्यसाधारण आहे.” असे उद्गार प्रा. सामंत यांनी काढले. 


या अद्ययावत संगणक प्रयोगशाळेतील संगणक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि संगणक शास्त्राचे विद्यार्थी वापरतील. विद्यार्थ्यांना कौशल्याने सक्षम करण्यासाठी तुम्ही ह्या संगणक  प्रयोगशाळेचा वापर करून इथल्या विद्यार्थांना संगणकीय दृष्ट्या साक्षर कराल, असा विश्वासही प्रा. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या