काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ आज महाराष्ट्रात दाखल होणार; स्वागतासाठी मोठे नेते उपस्थिती लावणार..




प्रतिनिधी: अवधुत सावंत


  गेल्या अनेक महिन्यांपासून देशांच्या विविध राज्यातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेली 'भारत जोडो यात्रा' आज ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. सध्या तेलंगणा मध्ये असलेली ही यात्रा तेलंगणा महाराष्ट्राच्या सीमेनजीक असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार असून इथून पुढे राज्यातील इतर जिल्ह्यात ही पदयात्रा जाणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, हुसेन दलवाई, सचिन सावंत, नसीम खान बाळासाहेब थोरात, मोहन जोशी इत्यादी नेते राहुल गांधींच्या स्वागतासाठी हजेरी लावणार असल्याचे समजते.


  महाराष्ट्रात भारत जोडो पदयात्रा १४ दिवस प्रवास करणार असून, सध्या नांदेडच्या देगलूर येथे या निमित्त जय्यत तयारी करणे सुरु आहे. पदयात्रेच्या सुनियोजनानूसार महाराष्ट्रातील हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा, वाशीम इत्यादी जिल्ह्यातून ही यात्रा पुढे जाणार असून यानंतर पुढील प्रवासाकरिता मध्य प्रदेश राज्यात प्रवेश करणार आहे. आज राहुल गांधी यांचा मुक्काम नांदेडच्या देगलूर मध्ये राहणार असून अनेक मोठे नेतेमंडळी त्यांची भेट घेणार आहेत.


  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेस नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदित्य ठाकरे, राज्य प्रभारी एच. के. पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संतोष केणे हेदेखील या यात्रेत सहभागी होणार आहे परंतू या नेत्यांच्या नेमक्या तारखेबाबत अद्याप स्पष्टपणे माहिती पुढे आली नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील पदयात्रेत समावेश होणार असल्याची स्पष्टोक्ती अशोकराव चव्हाण यांनी दिली. एकंदरीतच राज्याचे राजकीय वातावरण राहूल गांधी यांच्या पदयात्रेने ढवळून निघणार असून महाविकास आघाडी नेते यानिमित्ताने एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करण्याची संधी साधताना दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या