राहुरी - दि. १४ ऑगस्ट २०२२
महात्मा फुले कृषी विद्यापीठात होस्टेल व मेसच्या व्यवस्थेसह तात्काळ स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदणात ढुस यांनी म्हंटले आहे की, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात अभ्यास करून आज पावेतो राज्यातील अनेक गरीब शेतकऱ्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून शासनाच्या विविध विभागात ते आज उच्च पद भूषवित आहेत.
राहुरी सारख्या ग्रामीण भागामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे हजारो विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीची राहण्याची व्यवस्था आहे. सुसज्ज ग्रंथालय आहे. अभ्यासिका आहे, उत्कृस्ट शिक्षक आहेत, आणि त्यामुळेच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्यातील आकडेवारी पाहता या विद्यापीठात सर्वात जास्त आहे.
राज्यातील गरीब शेतकऱ्यांची मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करणेसाठी पुणे, मुंबई व दिल्ली येथे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे स्पर्धा परीक्षे पासून कित्येक मुले वंचित राहतात. असे विद्यार्थी या विद्यापीठात येऊन मिळेल त्या प्राप्त परिस्थितीत अभ्यास करून यश संपादन करतात. परंतु या विद्यापीठामध्ये परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांची संख्या वाढली की, विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ वाद होतात व त्याचा सर्वच मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो.
त्यामुळे शासनाने या विद्यापीठात नाममात्र फी आकारून होस्टेल, मेस, अभ्यासिका अश्या सर्व सुविधांनी युक्त असे स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षेत यश संपादन करता येईल.
म्हणून स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम ठेवून राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात नाममात्र फी मध्ये होस्टेल, मेस, अभ्यासिका, ग्रंथालय अश्या सर्व सुविधांनी युक्त असे स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र तातडीने सुरू करावे व त्यासाठी योग्य ती आर्थिक तरतूद करावी अशी विनंती ढुस यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाची प्रत ढुस यांनी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू, विद्यापीठाचे कुलगुरू यांचेसह प्रहार अहमदनगर जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे यांना पाठविली आहे.
0 टिप्पण्या