आमदार रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
डोंबिवली ( शंकर जाधव )
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला त्यांच्या वागणुकीतून पक्षासाठी त्याग व समर्पण भावनेचा आदर्श घालून दिला आहे. त्याच आदर्शवर आपण एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणे आवश्यक आहे. मात्र ते करत असताना हिंदुत्व आणि विकास हे समांतर नेण्याचे धोरण आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे, असे उद्गार आमदार रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत बोलताना काढले.
शिवसेना-भाजपा सरकार पुन्हा प्रस्थापित करण्यात सुरत ते गुवाहाटी अशी ऑपरेशन कमळ राबविणारे मिशन कंट्रोलर ही कामगिरी बजविल्यानंतर रविंद्र चव्हाण गुरूवारी डोंबिवलीत परतले. भाजपा कल्याण जिल्ह्याच्यावतीने शहरात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.
आमदार रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा आणि कौतुक सोहळा पूर्वेकडील सावरकर रोडला असलेल्या उद्यानातील जाणता राजा कार्यालयात आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, अंबरनाथ माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले-पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, रेखा चौधरी, माजी नगरसेवक विकास म्हात्रे, राहुल दामले, नंदकुमार जोशी, प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते.
पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर ती, तन, मन आणि धनाने पूर्ण करणे हेच एक कार्यकर्ता म्हणून ध्येय ठेवले. सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतील एक छोटी जबाबदरी मला दिली आणि त्या जबाबदारीने मला मोठे केले असे फार तर मी म्हणेन असे प्रतिपादन आमदार चव्हाण यांनी केले. मात्र संयम हीच भाजपा कार्यकर्त्याची खरी ताकद असून सत्तेमुळे जबाबदारीचे भान ठेवा असा सल्ला चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला. नरेंद मोदी यांना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करायचे आहे. त्यामुळे समर्पण भावनेने पक्षाची आणि जनतेची कामे करत रहा, असे आवाहन चव्हाण यांनी शेवटी बोलताना केले.


0 टिप्पण्या