सिद्धार्थ कॉलनीतील हजारो रहिवाशांचा २५ रोजी 'मातोश्री " वर जनआक्रोश मोर्चा
*दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने लोक हैराण
मुंबई- विजेची थकीत रक्कम न भरल्याने पुन्हा एकदा अदानी वीज कंपनीकडून चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमधील सुमारे साडेतीन हजार घरमालक रहिवाशांच्या घराचा वीजपुरवठा १५ फेब्रुवारीपासून दररोज सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने इथल्या रहिवाशांनी आता आपल्यावरील या अन्यायाचे गाऱ्हाणे सांगण्यासाठी येत्या २५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सिद्धार्थ कॉलनी घर हक्क संघर्ष समितीने दिली आहे.
चेंबूरमधील पूर्व द्रुतगती मार्ग आणि शीव-पनवेल महामार्गाच्या मध्यभागी ही सिद्धार्थ कॉलनी वसली असून यामध्ये साडेतीन हजार घरे आहेत.२००५ मध्ये एका विकासकाने याठिकाणी एसआरए अंतर्गत इमारती उभ्या करून झोपडीतून सर्वांना इमारतीमध्ये घरे देण्याचे आमिष दाखवले.त्याचवेळी सर्व रहिवाशांचे वीजबील देखील भरणार असल्याचे आश्वासन विकासकाने दिले होते. त्यामुळे २००५ पासून येथील साडेतीन हजार कुटुंबीयांनी वीज बील भरलेच नव्हते.कोटींच्या घरात हे वीजबील पोहचल्यानंतर २०१७ आणि २०१९ ला या सर्व रहिवाशांची वीज बंद करण्यात आली होती.मात्र काही राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वीजपुरवठा सुरळीत केला होता.त्यानंतर यातील काही घरे सोडल्यास गेल्या तीन वर्षांपासून अनेक नागरिक नियमित वीज देयक भरत आहेत.मात्र सध्या ही थकबाकी ९९ कोटींच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे अदानी कंपनीने १५ फेब्रुवारीपासून पुन्हा येथील वीज पुरवठा खंडीत केला आहे.मात्र हा सरसकट रहिवाशांवर अन्याय असून वीजपुरवठा खंडित केल्याने विद्यार्थी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.त्यामुळेच आम्ही या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले असल्याचे या संघर्ष समितीचे लहू कांबळे, भगवान गरुड,राजू घेगडमल,मोगलभाऊ गवारे आणि सुरेश गाडे यांनी सांगितले.

0 टिप्पण्या