बोगस चेक प्रकरणी आणखी एकास अटक अटक आरोपींची संख्या पोहोचली आठवर

 बोगस चेक प्रकरणी आणखी एकास अटक अटक आरोपींची संख्या पोहोचली आठवर



डोंबिवली  ( शंकर जाधव )  बँकांमध्ये कोट्यवधी रूपयांचे बोगस चेक वटविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आणखी एकास गुजरात राज्यातून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मानपाडा पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या अटक आरोपींची संख्या ८ वर पोहोचली आहे. त्यातील ४ जणांना जेल, तर अन्य चौघांना पोलिस कोठडीत डांबण्यात आले आहे.

    भावेशकुमार लक्ष्मणभाई ढोलकीया (४३) असे या टोळीच्या म्होरक्याचे नाव असून तो गुजरात राज्यातल्या भावनगरमध्ये राहणारा आहे. पोलिसांनी आतापर्यंत भावेशकुमार ढोलकीयासह हरिश्चंद्र कडव (६५), नितीन शेलार (४०), अशोक चौधरी (४०) मजहर उर्फ मुजहीद खान (२०), उमर फारूक (37) आणि सचिन साळसकर (२९) अशा  ८ जणांना अटक केली आहे. यातील हरिश्चंद्र कडव, नितीन शेलार, अशोक चौधरी आणि मजहर उर्फ मुजहीद खान या चौघांची रवानगी कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात करण्यात आली आहे.

     या संदर्भात एचडीएफसीच्या कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या दावडीतील शाखेचे मॅनेजर विशाल रामप्रसाद व्यास (45) यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी भादंवि कलम 420, 467, 468, 469, 511, 34 अन्वये ऑक्टोबर 2021 रोजी गुन्हा दाखल केला होता.

     डोंबिवलीतील इंडस टॉवर प्रा. लि. नामक कंपनीच्या नावाचा 24 करोड रुपयांची रक्कम नमूद असलेला चेक 1 ऑक्टोबर 2021 रोजी एचडीएफसी बँकेच्या दावडी शाखेत सादर केला. विशेष म्हणजे त्या चेकवर असणाऱ्या सह्या देखील तंतोतंत जुळत होत्या. मात्र चेकची प्रिंट वेगळ्या शाईत असल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ब्रँच मॅनेजर विशाल व्यास यांना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी या चेकवर संशोधन केले असता हा चेक पूर्ण बोगस असल्याने बँक मॅनेजर विशाल व्यास यांनी मानपाडा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. यामागे असलेल्या टोळीचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्ह्याची पार्श्वभुमी पाहता पोलिसांनी टोळीतील आठही जणांना बेड्या ठोकल्या.

       या टोळीकडून आतापर्यंत गुजरात राज्यातील 3, तामीळनाडू व कर्नाटक राज्यातील 1 गुन्हा असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून चेक बनविण्यासाठी वापरण्यात येणारे लॅपटॉप, प्रिंटर, मोबाईल फोन व 3 बोगस चेक असा एकूण 1 लाख 22 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बोगस चेक कांडात बँकांशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांही प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या सहभाग असण्याची आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या