अर्थसंकल्प हा राष्ट्रीय अर्थकारण राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक

 अर्थसंकल्प हा राष्ट्रीय अर्थकारण राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न  ज्येष्ठ अर्थतज्ञ चंद्रशेखर  टिळक 




डोंबिवली ( शंकर जाधव ) २०२२-२३ सालासाठीचा नुकताच सादर झालेला अर्थसंकल्प हा आपले राष्ट्रीय अर्थकारण राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा असा हा अर्थसंकल्प आहे. आणि हा प्रयत्न अगतिक अवस्थेतून केलेला नसून प्रागतिक भूमिकेतून केलेला आहे. या अर्थसंकल्पात प्रसंगी तपशीलापेक्षा तत्वावर जास्त भर देण्यात आलेला आहे असे नक्कीच जाणवते .ही उणीव या अर्थसंकल्पात जरी जरूर जाणवत असली तरी येणाऱ्या काळात कोणत्या बाबी वैयक्तिक उत्पन्नाच्या  , पर्यायाने राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीच्या द्रुष्टीने नजरेआड करून चालणार नाही याचे नेमके दिग्दर्शन हा अर्थसंकल्प करतो असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, गुंतवणुक सल्लागार व प्रशिक्षक  चन्द्रशेखर टिळक यांनी केले.

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सालाबाद प्रमाणे आयोजित केलेल्या अर्थसंकल्पीय विश्लेषणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


" डी " हे अक्षर भारतीय इतिहासात फारसे सकारात्मक अर्थाने प्रसिद्ध नाही. मात्र डिजिटल रुपया आणि डिजिटल इंडिया असे जणू काही  घोषवाक्य म्हणून मिरवणाऱ्या या अर्थसंकल्पाने डी या अक्षराला सन्मान मिळवून दिला आहे असे सांगत टिळकांनी आपल्या विवेचनात डिजिटल रुपया ही संकल्पना सविस्तर स्पष्ट केली. विशेषतः डिजिटल रुपया हे क्रिप्टो- करन्सी नाही याचे सोदाहरण स्पष्टीकरण आणि त्याची गुगल- पे , फोन - पै , फास्ट- टग मनी , प्रवासी चेक अशी पैशांची देवाण- घेवाण करण्याचे विविध पर्याय अशा आपल्या नेहमीच्या आयुष्यातील उदाहरणांशी डिजिटल रुपयाची तुलना करत केलेली चर्चा हे या विश्लेषणाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्याचवेळी डिजिटल रुपया येण्यातून महागाईला  आळा बसण्याचा मुद्दा पूर्णपणे गैरलागू असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. काळ्या पैशांच्या नियंत्रणासाठी डिजिटल रुपया किती प्रमाणात यशस्वी होईल हे डिजिटल रुपया किती प्रमाणात , किती क्षेत्रात आणि किती वेगाने स्वीकारला जाईल यावर अवलंबून राहील असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

     अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या स्थितिच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पातील वेगवेगळ्या तरतूदी , त्यातल्या अडचणी आणि त्यांतून निर्माण होणाऱ्या तसेच प्रसंगी न होणाऱ्याही  उत्पन्न- रोजगार- गुंतवणूक यांच्या विविध संधी या बाबींचा उहापोह श्री. चन्द्रशेखर टिळक यांनी आपल्या विवेचनात केला. २०२२ हे चन्द्रशेखर टिळक यांचे अर्थसंकल्पीय विश्लेषणांचे सलग ३५ वे वर्ष आहे. त्यामुळे कै. नानी पालखीवाला यांच्या अर्थसंकल्पीय विश्लेषणाच्या विक्रमाची बरोबरी टिळकांनी यावर्षी केली. त्याप्रीत्यर्थ कार्यक्रमाच्या सुरवातीला  सुधीर जोगळेकर यांनी शब्दांकित केलेले मानपत्र मंडळाचे अध्यक्ष  सुशिल भावे यांच्या हस्ते देऊन मंडळातर्फेत चंद्रशेखर टिळकांचा सत्कार करण्यात आला.  मानपत्राचे वाचन डॉ. प्रसाद भिडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या