डॉ.रामदास कोकरे यांच्या संकल्पना
सी.बी.एस. ई च्या शालेय अभ्यासक्रमात
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे विद्यमान उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांनी वेंगुर्ले नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदी असताना वेंगुर्ला परिसरात शून्य कचरा मोहिमेबाबत भरीव काम केले.त्यांच्या या कामाची दखल सी.बी.एस.ई बोर्डाने घेतली असून इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात या विषयाबाबतच्या धड्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे .
याशिवाय कर्जत, माथेरान मध्ये देखील डॉ रामदास कोकरे यांनी वेंगुर्ला प्रमाणे कचरा विरहित शहर व डंपिंग ग्राउंड विकसित केले आहे. माथेरान नगरपरिषद ने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एका रस्त्याला 'मुख्याधिकारी रामदास तुकाराम कोकरे मार्ग'असे नांव दिले आहे. स्वच्छते बाबत कमालीचे शिस्तप्रिय, सजग आणि अभ्यासू म्हणून ओळखले जाणारे डॉ कोकरे यांनी आता पर्यंत च्या शासकीय सेवेत 30 कोटी रु.हून अधिक रक्कम बक्षीस रूपाने विविध शहरांना प्राप्त करून दिली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रुजू झाल्यावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना साथ ऐन भरात असतानादेखील उपायुक्त डॉ. कोकरे यांनी शून्य कचरा मोहिमेचा प्रारंभ २० मे २०२०पासून केला आणि कल्याण डोंबिवली परिसर कचरामुक्त होण्यासाठी ते भगीरथ प्रयत्न करीत आहेत. डॉ .रामदास कोकरे यांनी वेंगुर्ले शहरात कार्यरत असताना राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची दखल आता शासनाने घेतली असून 'वेंगुर्ले पॅटर्न'चा धड्याचा समावेश आता सीबीएससी अभ्यासक्रमातील मुलांच्या इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आल्याने, डॉ. कोकरे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
कल्याण-डोंबिवलीत महापालिकेत रुज झाल्यापासून डाॅ.रामदास कोकरे साहेबांनी कचरामुक्त कल्याण-डोंबिवली शहर करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वप्रथम कल्याण-डोंबिवली शहराच्या जागोजागी, कानाकोपऱ्यात असलेल्या कचर्याने भरभरुन वाहणाऱ्या सर्व कचराकुंड्या बंद केल्या. 'ओला व सुका कचरा' ही संकल्पना त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व लोकांच्या दारोदारी जाऊन राबवली. आज बर्याच अंशी शहर कचरा कुंडी मुक्त दिसून येत आहे परंतु या त्यांच्या संकल्पनेला आणि आपले शहर सुंदर ठेवण्याच्या मार्गात काही अशिक्षितांसह सुशिक्षित नागरिक आड येत आहेत, गपचूप गाडीवरून कचरा रस्त्याच्या कडेला टाकून पळून जायची सवय अजून आपल्या नागरिकांची मोडलेली नाही त्यामुळे काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळतात. अशा नागरिकांना दंड आकारण्याचे काम उपायुक्त कोकरे यांनी केले.
0 टिप्पण्या