पोलिसांकडून परस्परविरोधी गुन्हा दाखल




डोंबिवली ( शंकर जाधव ) 


कल्याण पूर्वेकडील सूचकनाका परिसरात राहणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ग्रामीण सचिव शमीम शेख यांच्या कार्यालयावर शुक्रवारी रात्री तोडफोड करत तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्यात आले. या प्रकरणी शमीम शेख यांनी काही महिन्यापूर्वी आपल्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तरूणावर कारवाई केल्याच्या रागातूनच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तर कार्यालयावर हल्ला करणारा प्रशांत पठारे या तरुणाने थेट कोळसेवाडी पोलिस ठाणे गाठत शमीम यांचा भाऊ बाबू हा परिसरात दहशत पसरवत असून रात्री-अपरात्री घरी जाताना मारहाण करतो, असा आरोप करणारी तक्रार दाखल केली आहे.

     प्रशांत पठारे या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी शमीम यांचा भाऊ बाबू याने रस्त्यात गाठून मारहाण केली. मात्र भाऊ राजकिय पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यानेच त्याची परिसरात दहशत वाढत असल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलले आहे. आता तरी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षितता उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करत बाबू विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर शमीम यांनी आपल्या भावाशी आपला संबध नसून भावाचा राग माझ्या कार्यालयावर का काढला ? असा जाब विचारत संबधितांविरोधात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तक्रार दाखल केली. कोळसेवाडी पोलिसांनी दोघांचे म्हणणे ऐकून त्यांच्यावर परस्परविरोधी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या