प्रत्येक कुटुंबात मुल जन्माला येता क्षणी त्याच्या शिक्षणाची तजवीज सुरू होते.कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा, कोणत्या माध्यमात प्रवेश घ्यायचा हे विषय अगदी ऐरणीवर येतात. माध्यमां बाबत बोलायचे झाले तर प्रादेशिक भाषेतील शाळा हळूहळू कमी होत असल्याचे विदारक सत्य आपल्या समोर येते. कारण
सध्या आपण बघतो की बरेच पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात पाठवण्यासच इच्छुक असतात.
कारण एक तर आपल्या मुलाला मुलीला इंग्रजी लिहिता आणि बोलता यावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी बोलता न आल्याने आपल्याला आलेल्या अडचणी निदान त्यांना त्यांच्या आयुष्यात येऊ नयेत म्हणून अगदी आपल्या घरी जरी कोणाला इंग्रजी येत नसेल तरीही बरेच पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवतात.
या बाबत विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की शाळा इंग्रजी असो इतर कोणत्याही माध्यमातील असो, बरीच मुलं घरी संभाषण करताना मात्र मातृभाषेतच करतात किंवा हिंदीचा आधार घेतात. यामुळे काय होते की ज्या उद्देशाने पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातले आहे तो उद्देश मागे पडतो.
मातृभाषेचा प्रयोग आपण सहज करू शकतो कारण ते लहानपणापासून आपल्या कानावर पडलेली असते. बाहेरच्या जगात वावरताना मात्र जेथे अपरिहार्य असते तिथे इंग्रजी बोलतानाची भीती मुलांच्या मनात घर करते. ते सहजासहजी इंग्रजी संभाषण करू शकत नाहीत.
इंग्रजी भाषा कशी आत्मसात करावी, दैनंदिन जीवनात कधी कशी बोलावी यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी नुकतेच प्रकाशित झालेले इंग्रजी माझ्या खिशात हे प्रज्ञा पंडित लिखित पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले.
इंग्रजी ही भाषा व्यावहारिक भाषा आहे. या व्यावहारिक भाषेत कसे बोलावे, कुठले शब्द कधी वापरावे यासाठी लेखिकेने जरी या पुस्तकात आपले मनोगत मांडताना लेखिकेने केवळ व्हर्नॅक्युलर माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थी वर्गाचा विचार अधिक केला असला, तरी मला असे वाटते की हे पुस्तक सर्वांसाठी उपयुक्त आहे.
इंग्रजीची भिती जे मनात बाळगतात त्या सर्वांसाठी हे पुस्तक लाभदायी आहे. इंग्रजी शिकवणारी अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. तरी लेखिकेने या पुस्तकाला योग्य न्याय दिला आहे. जर एखाद्याला मुलाखतीसाठी जायचे असेल तर लास्ट मिनिट रिविजन तो यातून करू शकतो.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखिकेने इंग्रजीची भीती घालवण्यासाठी काही सोप्या टीप्स दिल्या आहेत. कोणते शब्द कधी वापरावे म्हणजे शुभेच्छा देताना, विनंती करताना, निरोप घेताना कोणते शब्द वापरावेत, तसेच मॅनेरिझम सांगणारे कोणते शब्द आहेत हे देखील लेखिकेने शीर्षकासह दिले आहेत.
शिर्षकामुळे आणि ते अधोरेखित केल्यामुळे त्या शब्दांपर्यंत वाचक लवकर पोहोचू शकतात. तसेच शालेय अभ्यासक्रमात आपण शिकलेले व्याकरण कधी वापरायचे,कोणता काळ कधी वापरावा, त्याचा उपयोग वाक्यात कसा करावा, त्याचे नियम काय आहेत हे सुद्धा आपल्याला या पुस्तकातून छोट्या-छोट्या उदाहरणासहित लेखिकेने स्पष्ट करून सांगितले आहे.
इतर इंग्रजी शिकवणारी जाडजूड अनेक पुस्तके आहेत पण ती मोठी असल्यामुळे प्रत्येकवेळी आपण ती सहज आपल्या जवळ बाळगू शकत नाही.
हे पुस्तक केवळ पस्तीस पानांचे आहे. त्यामुळे आपण ते सहज कुठेही बाळगू शकतो.
पुस्तकात सहज सोप्या वाक्यरचना व चपखल शब्द आपल्याला लगेच मिळतात व त्या आपण नित्य वापरात आणू शकतो. सगळ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती पळून जावी हा लेखिकेचा प्रयत्न स्तुत्य आहे. पुस्तक खूपच माफक दरात उपलब्ध आहे.
आणि म्हणूनच इंग्रजी बोलण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाकडे ' इंग्रजी माझ्या खिशात ' या पुस्तकाची एक तरी प्रत असायला हवी.
पुस्तक - इंग्रजी माझ्या खिशात
लेखिका - प्रज्ञा पंडित
संपर्क - 9320441116
समीक्षक - स्नेहा उदय पोंक्षे

0 टिप्पण्या