घराच्या रिकाम्या गच्चीचा ‘असा’ करा वापर, महिन्याला कमवा लाखो रुपये..

 घराच्या रिकाम्या गच्चीचा ‘असा’ करा वापर,

महिन्याला कमवा लाखो रुपये..



प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

  कोरोना महामारीच्या काळात आपल्या सर्वांच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. माणसापासून ते सरकार पर्यंत सर्वानाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. थोडक्यात काय तर, कोरोना नंतर नोकरीपासून खाण्यापर्यंत लोकांना लढावं लागलंय. आजदेखील तीच परिस्थिती कायम आहे.


  एकीकडे, बऱ्याच लोकांना रोजगार गमवावा लागला तर दुसरीकडे अनेक लोकांना घरून काम करण्याची संधी देखील मिळाली. आता कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आलेली आहे. त्यामुळे बेरोजगारीची टांगती तलवार पुन्हा डोक्यावर लटकती आहेच. अशातच, एक नामी संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. ज्यात तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता.


काय आहे ही संधी..


  याकरता तुम्हाला फक्त तुमच्या घराच्या रिकाम्या छताचा वापर करायचा आहे. रिकाम्या गच्चीवर सोलर पॅनल बसवून तुम्ही ही संधी साधू शकता. सोलर पॅनल कुठेही बसवता येतात. घराच्या छतावर सुद्धा सोलर पॅनल बसवून तुम्ही वीज निर्मिती करू शकता. या वीजनिर्मितीचा ग्रीडमध्ये सप्लाय करता येईल. सोलर पॅनल लावण्यासाठी केंद्र सरकार अनुदानही देतं. सरकारच्या 'न्यू अँड रिन्युएबल एनर्जी' मंत्रालयाकडून सौर पॅनेल बसवणाऱ्यांना रूफटॉप सोलर प्लांटवर ३० टक्के अनुदान देखील दिलं जातं. अनुदानाशिवाय रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यासाठी सुमारे १ लाख रुपये खर्च येतो.


  साधारणतः एका सोलर पॅनलची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. हा खर्च प्रत्येक राज्यानुसार वेगळा असतो. मात्र सरकारकडून अनुदान मिळाल्यानंतर अवघ्या ६० ते ७० हजार रुपयांमध्ये एक किलोवॅट क्षमतेचा सोलर प्लांट उभारता येईल. काही राज्ये यासाठी स्वतंत्रपणे अतिरिक्त अनुदानदेखील देतात. जर तुमच्याकडे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एकरकमी ६० हजार रुपये नसतील, तर तुम्ही कोणत्याही बँकेकडून त्यासाठी गृहकर्ज देखील घेऊ शकता. यासाठी अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना गृहकर्ज देण्यास सांगितले आहे.


  सोलर प्लांटसाठी अनेक बँका कर्ज देतात. यासाठी तुम्ही बँकेकडून सौर अनुदान योजना, कुसुम योजना, राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियानांतर्गत एसएमई (SME) कर्ज घेऊ शकता. या व्यवसायातून एका महिन्यात ३० हजार रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न तुम्ही घेऊ शकता. यासोबतच सौर व्यवसायासाठी अनेक योजनांतर्गत भारत सरकार ३० टक्क्यांपर्यंत अनुदान देतं. तुमच्या जिल्ह्यातील अक्षय ऊर्जा विभागाला भेट देऊन तुम्ही या योजनांची माहिती मिळवू शकता.


उत्पन्न कसे मिळवणार..


  साधारणपणे, २५ वर्षांपर्यंत सोलर पॅनेलचं आयुष्य असतं. तुम्ही हे पॅनल तुमच्या घराच्या छतावर सहज बसवू शकता. या पॅनेलमधून तुम्हाला मोफत वीज मिळेलच, शिवाय तुम्ही उर्वरित वीज ग्रीडद्वारे सरकार किंवा वीज कंपनीला विकू शकता. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल लावले, व दिवसातील १० तास सूर्यप्रकाश असेल, तर यामधून सुमारे १० युनिट वीज निर्माण होईल. महिन्याचा हिशेब केला तर दोन किलोवॅट सोलर पॅनल सुमारे ३०० युनिट वीज निर्माण करेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या