घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तीन तास रेल्वे रोखली तर सबंध देशातील रेल्वे वाहतूक ठप्प होईल-डाॅ.जितेंद्र आव्हाड
कल्याण ( शंकर जाधव) चार पिढ्या जिथे वाढल्या; त्या घरातून अचानक बेदखल करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही.
नोटीस पाठवणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवावे, गरीबी शाप असला तरी गरीब माणूस लाचार नाही. प्रसंगी जीव देऊ पण, घर सोडणार नाही. आता रेल्वेचे विस्तारीकरण नसतानाही जर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तीन तास रेल्वे रोखली तर सबंध देशातील रेल्वे वाहतूक ठप्प होईल, हे ध्यानात ठेवा, असा इशाराही गृहनिर्माण मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
गृहनिर्माण मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे रूळालगतच्या झोपड्या वाचविण्यासाठीच्या आंदोलनाचे रणशिंग फुंकले. दरम्यान, केंद्राने एसआरएचा कायदा स्वीकारावा; राज्य सरकार केंद्राच्या भूखंडावरील झोपडीधारकांना हक्काची घरे देऊ, असेही ना. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या भूखंडावर असलेली घरे जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार रेल्वे रूळांलगतच्या झोपड्या सात दिवसात रिकाम्या करण्याच्या नोटीसा रेल्वेने बजावल्या आहेत. या झोपड्यांच्या रक्षणासाठी ना. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे सरसावले आहेत. कल्याण आनंदवाडी भागातील झोपडपट्टीला भेट देऊन लढा उभारण्याचा इशारा दिला. या प्रसंगी माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हाअध्यक्ष जगन्नाथ शिंदे, सुधीर पाटील आदी उपस्थित होते. या झोपडीधारकांना संबोधित करताना, हा लढा तुमचा नाही तर माझा आहे. कळव्यातील ३५ हजार झोपडीधारकांच्या घरांवर जेव्हा असेच संकट आले तेव्हा मी पहाटेपासून तीन तास रेल्वे रोखून धरली होती आणि केंद्र सरकारला आपला निर्णय फिरवण्यास भाग पाडले होते. लक्षात ठेवा, हा लढा कोणा व्यक्तीविरुद्ध नाही. हा लढा केंद्राविरोधात आहे. हे केंद्र सरकार एवढे निर्दयी कसे होऊ शकते? राज्य सरकारच्या जमिनीवरील झोपड्यांना संरक्षण देण्यात आले आहे. केंद्र सरकारने आम्हाला प्रस्ताव दिला तर आम्ही योजना आणू आणि या झोपडीधारकांचे पुनर्वसन करू. या कारवाईत सुमारे पाच लाख लोक बाधीत होणार आहेत. एवढ्या लोकांना घराबाहेर काढण्यासाठी मिलिट्रीला बोलवावे लागेल. हे सर्व गोरगरीब लोकांना घाबरविण्यासाठी करण्यात आले आहे. आधी घाबरवून सोडायचे आणि नंतर घरं वाचविण्याचे आमीष दाखवायचे हे तंत्र केंद्रातल्या सरकारचे आहे. येथे राहणारे लोक हे पोटापाण्यासाठी गाव सोडून आले आहेत. गावात गावकुसाबाहेर राहावे लागले होते. इथे थोडेसे सन्मानाने जगण्याची संधी आली असतानाच ही नोटीस आली आहे. पण, नोटीस पाठवणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवावे, गरीबी शाप असला तरी गरीब माणूस लाचार नाही. प्रसंगी जीव देऊ पण, घर सोडणार नाही. आता रेल्वेचे विस्तारीकरण नसतानाही जर घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तीन तास रेल्वे रोखली तर सबंध देशातील रेल्वे वाहतूक ठप्प होईल, हे ध्यानात ठेवा, असा इशाराही ना. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

0 टिप्पण्या