संत झेवियर्स महाविद्यालय,मराठी वाङ्मय मंडळ-पखरण'२२ ह्या
वार्षिक अंकाचा प्रवास!
यंदा ९८ व्या वर्षात पदार्पण केलेले संत झेवियर्स महाविद्यालयाचे मराठी वाङ्मय मंडळ हे मुंबईतील सर्वात जुने मंडळ आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी "पखरण" या मंडळाच्या वार्षिक अंकाचे अनावरण, "पखरण- संवादाच्या पडद्याआड" या सोहळ्याद्वारे ,सोमवार दि. १७ जानेवारी रोजी झूम आणि युट्यूब लाईव्ह या माध्यमांद्वारे पार पडले. बऱ्याच वर्षांची "पखरण" अंकाची परंपरा असून, यामध्ये महाविद्यालयाच्या तरुण उदयोन्मुख लेखक, कवी ह्यांच्या साहित्याची, संपादकांनी उत्कृष्ट मांडणी केलेली असते.
"पखरण" म्हणजे विचारांची उधळण. म्हणजेच अनेक गोष्टींची, विषयांची रंगतदार मांडणी. यंदाचा "पखरण" संवाद या विषयावर बेतलेले असून, संवादाच्या विविध पैलूंवर भर देण्याचा प्रयत्न होता.
आपल्या जीवनात संवादाने कधी गुंतागुंत सोडवली तर कधी कल्पनाविष्कार, समाजहित घडवून आणले. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात हाच मैत्रीपूर्ण, विश्वासार्ह संवाद लोप पावत चालला आहे. आजही समाजात अशा काही समस्या आहेत ज्याबाबत उघडपणे बोलले जात नाही. थोडक्यात सांगायचे तर दैनंदिन संवादामध्ये 'communication gap' नावाचा एक अदृश्य पडदा निर्माण झाला आहे. हा पडदा बाजूला सारून पडद्याआड अगदी स्वतःपासून समाजापर्यंत दडलेल्या विचार, कल्पना आणि आशा-आकांक्षांची निराळी दुनिया नक्कीच उत्साहवर्धक आणि प्रगल्भ असेल यात शंकाच नाही. याच हेतूने यंदाच्या पखरणचा प्रवास सुरू झाला. महामारीच्या कठीण काळात देखील मंडळाने आपली परंपरा कायम ठेवली आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे.
पखरण निर्मितीचा प्रवास मजेशीर आणि गोड होता. लेखकांना आपलासा वाटणारा व सर्वसमावेशक असा विषय निवडताना "संवादाच्या पडद्याआड" ही थीम यंदाच्या पखरण मधून संवादाचे विविध पैलू उलगडायचे ठरवले, असे संपादिका कार्तिकी अरकल हिने सांगितले.
अंकातील लेख मगवण्यासाठी सर्वप्रथम एक जाहिरात प्रसिद्ध करून जवळजवळ ५० च्या वर लेख आम्हाला महाविद्यालयातील लेखकांकडून मिळाले. आणि विशेष गोष्ट म्हणजे या लेखांना भाषेचं, विचारांचं वा प्रकाराचं असं कोणतंही बंधन नव्हतं. मग आलेल्या सर्व लेखांतून सर्वोत्कृष्ट लेखांची निवड करणं व अमराठी असलेल्या लेखांचा मराठी मध्ये अनुवाद करणं, हे थोडं अवघड काम होतं. परंतु तरीही साहित्य विभाग आणि संपादक यांच्या उत्कृष्ट जुगलबंदीने हेही सहज शक्य झालं.
यावर्षीचा अंक जरा हटके आहे. कारण यावेळेस अंकास ऑडिओ स्वरूपाची जोड असून, अंक ऑनलाईन स्वरूपात देखील उपलब्ध असेल. जास्तीत जास्त वाचकप्रेमिंपर्यंत पोहोचणे आणि एक सर्वसमावेशक अंक प्रस्तुत करावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. ज्या व्यक्तींना मराठी वाचता येत नसेल, जे वाचकप्रेमी दृष्टिहीनता किंवा तत्सम आजाराने ग्रस्त असतील, अश्या सर्वांना पखरण चा आनंद घेता यावा, यासाठी पखरण मधील लेखांचे श्राव्य माध्यमात रूपांतर करण्यात आले आहे. जे Spotify, Anchor अश्या ॲप्स च्या माध्यमांतून उपलब्ध आहेत. पखरणच्या मांडणी-सजावट मध्ये गौरी सुर्वे, मंडळाची डिजीटल क्रीएटीव्ह विभाग प्रमुख हिने खूप छान काम केले.
पखरणच्या अनावरण सोहळ्याआधी काय सांगशील ज्ञानदा?, बोल बिनधास्त, The Art of Conversation, अशी ३ इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन्स अनुक्रमे सुप्रसिद्ध पत्रकार ज्ञानदा कदम, कलाकार मैथीली आपटे आणि अमन शुक्ला यांसोबत आयोजित केली होती.
पखरणच्या अनावरण प्रसंगी सुप्रसिद्ध लेखक, कवी आणि गीतकार श्री वैभव जोशी जी यांची प्रमुख उपस्थिती होती. संवाद व सद्यस्थितीत संवादाचे महत्त्व सरांनी सहज व सोप्या शब्दांत मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे व मंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. अनिता राणे-कोठारे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कवी, लेखक, गीतकार व पटकथालेखक सन्मा. प्रवीण दवणे जी व लोकसत्ता चे संपादक,मराठी पत्रकार, लेखक सन्मा. गिरीश कुबेर जी यांच्या अनुक्रमे लेख व मुलाखतीचा अंकात समावेश आहे. आपण सर्व साहित्य वाचनप्रेमिंनी आवर्जून ऑनलाईन आणि ऑडिओ स्वरूपात उपलब्ध असलेला "पखरण '२२" चा आस्वाद घ्या, तुम्हाला नक्कीच मनमुराद विचारांची ही संवादाची पखरण आवडेल. अधिक महितीसाठी mvm.xaviers या फेसबुक व इंस्टाग्राम वरील पेज ला नक्की भेट द्या.

0 टिप्पण्या