रिक्षाचालकाचा असाही प्रामाणिकपणा अनिल पाटणकरांनी केला विशेष गौरव
मुंबई - "आजकाल माणुसकीच शिल्लक राहिलेली नाही' असे वाक्य आपण अनेकदा ऐकत असतो.पण माणसाच्या याच उद्विग्न भावनेला छेद देणारी घटना नुकतीच चेंबूरमधील घाटले गाव परिसरात घडली आहे.एका रिक्षाचालकाने महिला प्रवाशाची त्याच्या रिक्षात विसरलेली रोख रक्कम आणि अत्यंत महत्वाची कागदपत्रे असलेली पर्स प्रामाणिकपणे त्या महिलेला परत केली आहे.ही वार्ता कानावर पडताच स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर यांनी लगेच त्या रिक्षाचालकाला भेटून त्याचा विशेष गौरव करून शाबासकी दिली.
शरद परब असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. घाटले गाव परिसरात राहणाऱ्या सुधा संपत या परब यांच्या रिक्षातून प्रवास करत होत्या.प्रवास संपल्यानंतर त्या आपली पर्स रिक्षातच विसरल्या होत्या.त्यांना घरी आल्यानंतर हे कळताच त्यांनी लगेच त्या जिथून बसल्या आणि उतरल्या त्याठिकाणच्या सोसायटी गेटकीपरला ही बाब सांगितली.दरम्यानच्या काळात शरद परब यांनीही प्रवासी सुधा संपत यांना शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याची पर्स त्यांना परत केली.या पर्समध्ये रोख रक्कम ,क्रेडिट कार्ड,पॅन कार्ड ,आधार कार्ड आणि इतर काही महत्वाच्या चीजवस्तू होत्या.सुधा संपत यांना आपली ही महत्त्वाची पर्स मिळताच त्यांना सुखद धक्काच बसला.त्या रिक्षाचालकाच्या रूपाने त्यांना जणू माणसातील माणुसकीचे दर्शन घडले.ही सर्व माणुसकीची कहाणी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या कानावर पडताच त्यांनीही माणुसकी दाखवत त्याच परिसरात राहणाऱ्या शरद परब यांची भेट घेऊन त्यांचा विशेष गौरव करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली

0 टिप्पण्या