मुंबईत थंडी सुरू होताच अंडी महागली घाऊक दरात तब्बल१०० रुपयांची वाढ

 मुंबईत थंडी सुरू होताच अंडी महागली घाऊक दरात तब्बल१०० रुपयांची वाढ



मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबईत थंडीची चाहूल लागली आहे.त्यामुळे घाऊक बाजारात अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये अंड्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात अंडी शेकडा १०० रुपयांनी महागली आहेत. किरकोळ बाजारात १५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता अंड्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत अशी माहिती मुंबई एग्ज असोसिएशनचे पदाधिकारी अफताब खान आणि राजू शेवाळे यांनी दिली आहे.


महाराष्ट्राबरोबरच हैदराबाद आणि कर्नाटकातून मुंबईत अंड्यांची आवक होते. यंदा अंड्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत या नोव्हेंबरमध्ये अंड्याच्या दरात शेकडा ११० रुपयांची घसरण झाली होती. मात्र डिसेंबरमध्ये थंडीत सुरू होताच अंड्यांच्या दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातही अंडी शेकडा १५० रुपयांनी महागली आहेत. मुंबईत दररोज ८० ते ९० लाख अंड्यांची विक्री केली जाते. मात्र नोव्हेंबरमध्ये अंड्यांची विक्री ४५ लाखांपर्यंत खाली घसरली होती. परंतु डिसेंबरमध्ये ती ४० लाखांनी वाढली. त्यामुळे अंड्यांच्या दरातही १०० रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती मुंबई एग्ज असोसिएशनचे पदाधिकारी अफताब खान आणि राजू शेवाळे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या