कोकणात सहकारी तत्त्वावर शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे ! हर्षद माने

 कोकणात सहकारी तत्त्वावर शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे ! हर्षद माने 

 


चिपळूण : कोंडमळा येथील केशवराव पंडित सभागृहात 'शारदा संगीत, कला, क्रीडा साहित्य संस्थेने आयोजित' शेतकरी कृषी परिसंवाद व शेतकऱ्यांशी वार्तालाप कार्यक्रम राबविण्यात आला.चिपळूण पंचक्रोशीतील शेतकरी, शेतीप्रेमी उपस्थित होते. शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करावी यावर मान्यवरांचे व्याख्याने झाली. उपस्थित शेतकऱ्यांनीही परिसंवादात आपली मते मी मांडली. शेती तज्ञ हर्षद माने यांनी या वेळी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सहकारी तत्त्वावर शेतकरी एकत्र आले तर त्यांना आपले भांडवल, संसाधने एकत्र करता येतील, कच्चा माल आणि ग्राहक दोघांशी बोलताना त्यांची बाजू भक्कम असेल, खर्च कमी होईल. सहकार क्षेत्रापेक्षा उत्पादक कंपनी सारखा अधिक व्यावसायिक पर्याय यासाठी योग्य राहील.  

कोकणातील शेतकऱ्यांनी काही ठराविक पिकांकडे ध्यान दिले पाहिजे. तांदूळ हे कोकणचे मुख्य पीक. त्याचा व्यावसायिक वापर न झाल्याने कोकणला त्याचा अर्थिक फायदा झाला नाही. पण म्हणून ते पीक नाकारायचे असे होत नाही. भातशेती खर्चिक पडते असे शेतकऱ्यांचे म्हणणे पडले. कोकणचे एकूण भात उत्पादन पाहता, होलसेल किंवा त्याच्या निम्म्या दरात, हा 2000 कोटींचा व्यवसाय आहे. त्याकडे दुर्लक्षही करुन चालणार नाही. काहीतरी सुवर्णमध्य काढायला हवा. व्यतिरिक्त काजू, नारळ, कोकम, सुपारी, काही भाज्या ही कोकणची पिके आहेत. त्यातील एक वा दोन पिके घेऊन, आपले लक्ष केंद्रित केले, आणि त्याला शेतकरी उत्पादक कंपनी सारख्या सहकार तत्वाची जोड दिली तर कोकणला देशातील ह्या पिकांच्या मार्केटवर कोकणची पकड राहील. ज्याच्या हातात पुरवठा, तो किंमत ठरवु शकतो. 

शेतक-यांनी उद्योग म्हणून शेतीकडे पाहिले पाहिजे. उद्योगात उद्योजक आपल्या सगळ्या खर्चाचे ताळेबंद बांधतो. त्याला उत्पादनाने भागले, की एका एककाचा खर्च मिळतो. त्यावर तुम्ही तुमचे प्रॉफिट मार्जिन लावा. येते ती किंमत. याला मार्क अप प्राईज असे म्हणतात. किंमत अशी ठरवली तर शेती तोट्यात जाणार नाही. दुर्दैवाने शेतकरी आपल्या उत्पादनाची किंमत ठरवण्याऐवजी इतरच घटक ते ठरवतात. पण आता शेतकऱ्याला थेट ग्राहकाला माल विकण्याची संधी आहे. त्यासाठी ह्या मार्क अप पद्धतीचा वापर शेतकऱ्याला करता येईल.

याशिवाय मार्केट सेगमेंटेशन म्हणजे बाजाराचे वर्गीकरण हा एक प्रकार मार्केटिंग मध्ये असतो. शेतकरी थेट ग्राहकाला विकणार असेल तर विविध पट्ट्यामध्ये आपली किंमत कमी जास्त करता येईल. अर्थात शेती आणि विक्री दोन्ही करणे त्याला जिकरीचे होईल. इथे कंपनी तत्व कामी येईल. पिकवणारा शेतकरी, आणि विक्री करणारी वेगळी व्यवस्था एकाच कंपनीचा भाग असेल तर हे करता येऊं शकेल. आज कोकणला येणारा भाजीपाला, दूध देशावरून येते. कोकण स्वतःची गरज स्वतः भागवू शकत नाही? कोकणात देशी गाईंचे दूध मिळू शकते. दापोली कृषी विद्यापीठाने कोकण कपिला ही कोकणात मिळणाऱ्या गाईची पैदास वाढावी म्हणून प्रयत्न केले आहे. ह्या गाईचे दूध ब्रॅण्डिंग करुन विकता येईल. मुंबईतला कोकणी माणूस आवर्जून ते घेईल. भाजी, फळे आणि दूध केवळ कोकणात विकली तरी त्याला किती मोठे मार्केट आहे. यासाठी कोकणातील विविध तालुक्यांमध्ये, गावांमध्ये आपली दुकाने झाली पाहिजेत. तिथे कोकणात पिकणाऱ्या गोष्टी मिळू दे... कोल्हापूर मध्ये पूर आला तेंव्हा कोकणचा मुंबईचा पुरवठा बंद राहिला. मुंबईला तांदूळ, भाजी, दुध, अंडी कोकणने पुरवली पाहिजेत. कोकणी शेतकऱ्यांनी केवळ कोकणला पुरवठा करू शकू अशी यंत्रणा तयार केली तर एक फार मोठे आणि जवळचे मार्केट मिळू शकेल.

कृषी निर्यातीत सेंद्रिय शेती उत्पादनाला फार महत्त्व आहे. कोकणात सेंद्रिय शेती किंवा त्यापुढे नैसर्गिक शेतीची संधी फार मोठी आहे. याचे कारण इथे रसायने, खते यांचा वापर कमी आहे. आणि शेती होत नाही पण होऊ शकते अशा जमिनी खुप आहेत. त्यामुळे, सेंद्रिय प्रमाणीकरण इथे लगेच होऊ शकेल. याचा फायदा आपण कोकणी शेतकऱ्यांनी उचलला पाहिजे. 

एकंदरीत एकत्र मिळुन काम करणे, आणि उत्पादन करणारा एक गट आणि विक्री विपणन करणारा दुसरा गट अशी कामांची विभागणी करुन, गावातील सर्व शेतकरी आणि तरूण यांना एकत्र करुन, कोकणातील सर्व तालुक्यांत मार्केटिंग व्यवस्था निर्माण करुन, एक चांगली स्वयंसिद्ध अशी यंत्रणा कोकणात निर्माण करता येऊ शकते.

उद्योजक वसंत उदेग, नैसर्गिक शेती अभ्यासक नंदादीप पारनेरकर यांनीही मौलिक मार्गदर्शन केले.

उपस्थित शेतकऱ्यांनी संपूर्ण विषय समजून घेतल्यानंतर सखोल चर्चा केली, आपली मते आणि अनुभव मांडले. 

या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अधोरेखित झाली, कोकणचा शेतकरी आता काही नवीन करण्यास उत्सुक आहे, एकत्र यायला तयार आहे. आपण कुठेतरी कमी पडलो, आणि कुठे कमी पडलो हे त्याला माहित आहे,  कोकणचा माणूस मुंबईला गेला याचा परिणाम म्हणून कोकणची प्रगती थांबली आणि परप्रांतीय घुसले हे त्याला कळते. म्हणुन मुंबईत जाणारा माणूस थांबावा आणि गेलेत त्यांनी विशेषतः तरूणांनी परत यावे असेही त्यांना वाटते. शेतकरी श्रीमंत होऊ शकतो, आणि कोकणातील शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे असे त्याला वाटते.

कोकणच्या बदलाची ही नांदी आहे. पुढच्या दहा वीस वर्षात कोकण बदलणार आहे. हया बदलात आणि त्याच्या चांगल्या परिणामात इथल्या भूमिपुत्राचा पुर्ण सहभाग असावा...

सर्वश्री हेमंत तांबे, भरत आंबेटकर, संजय कोकाटे, आशिष शेंबेकर, सचिन शेंबेकर सर्व विश्वस्त, कार्यकर्त्यानी बहुमोल परिश्रम घेतले, चंद्रकांत सावर्डेकर यांनी यशस्वी आयोजन आणि प्रास्ताविक केले. उपस्थितांनी शेतकऱ्यांसाठी असे सातत्याने कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मनोगत व्यक्त केले.

 विश्वनाथ पंडित

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या