संभाव्य ओमीक्रॉन विषाणू प्रादुर्भावाबाबत घाबरु नका
पण पूरेपुर खबरदारी व काळजी घ्या !
--महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
डोंबिवली ( शंकर जाधव ) दक्षिण आफ्रिका येथून आलेला एक ३२ वर्षाचा इसम कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेले आहे. याबाबतची माहिती महानगरपालिकेस संबंधित लॅब कडून प्राप्त होताच सदर व्यक्तीस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सदर इसमाच्या ८ जवळच्या नातेवाईकांची करोना चाचणी केली असता त्यांचे सर्वांचे कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आढळून आले असून सदर बाब दिलासादायक आहे.या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याचे सॅम्पल जिनोम सिक्वेसिंग साठी कस्तुरबा रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. परदेशात इतरत्र ओमीक्रॉन या कोविडच्या नव्या विषाणूचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव पाहता, महानगरपालिका क्षेत्रातही महापालिकेमार्फत खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता मास्क परिधान करणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा कटाक्षाने अवलंब करावा व आपले कोविड लसीकरण वेळीच करून घ्यावे व संभाव्य ओमीक्रॉन विषाणू प्रादुर्भावाबाबत न घाबरता पुरेपुर खबरदारी व काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केली आहे.

0 टिप्पण्या