रोहीत शर्माचा नवा डाव विजयाने सुरू !




                   भारत आणि न्यूझिलंड यांच्यातील तीन टि- ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडीयम स्टेडियमवर झालेल्या पहिल्याने सामन्याने सुरुवात झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझिलंडने एकशे पासष्ठ धावा जमविल्या. प्रत्युत्तरात भारताने पाच गडी व दोन चेंडू राखत अतिशय रंगलेला सामना जिंकून मालिकेचा विजयी श्रीगणेशा केला.

               टि- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा नुकतीच युएईमध्ये संपन्न झाली. न्यूझिलंडने या स्पर्धेत उत्कृष्ठ खेळ करत उपविजेतेपद मिळविले. परंतु टिम इंडियाने आपल्या निकृष्ठ खेळाने स्वतः बरोबर देशाचेही हसू करून घेत साखळीतच गाशा गुंडाळला. त्यानंतर संघात फार मोठे बदल करण्यात आले. कोहली कर्णधार पदावरून पायउतार झाला तर रवी शास्त्रीचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर रोहीत शर्मा कोहलीच्या जागेवर टिम इंडियाचा कर्णधार बनला तर शास्त्रींची जागा माजी कर्णधार व महान भारतीय खेळाडू राहुल द्रविडने घेतली.

               एकसारखे स्वभाव व समान विचारसरणी असलेले रोहीत शर्मा व राहुल द्रविड यांच्या बाबत एक अजब योगायोग घडला. सन दोन हजार सातमध्ये रोहीतने भारतीय संघात प्रवेश केला तेंव्हा भारताचा कर्णधार राहुल द्रविड होता आणि या सामन्याद्वारे रोहितने भारताचा कर्णधार म्हणून धुरा स्विकारली तेंव्हा भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच होता ! दुसराही अजब संयोग असा की राष्ट्रीय रणजी स्पर्धेद्वारे प्रथमच मुंबईचं नेतृत्व केलेला सामना जयपूरच्या ज्या सवाई मानसिंग स्टेडीयम झाला त्याच स्टेडीयमवर रोहीतने आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रथमच अधिकृत कर्णधारपद भूषविलं !

                   भारताने संघात तीन बदल करत श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर व मोहम्मद सिराज यांना संधी दिली. व्यंकटेश अय्यरने पदार्पण केले खरे परंतु त्याला गोलंदाजीची संधी मिळालीच नाही, शिवाय फलंदाजीत दोन चेंडूत चार धावा काढून बाद झाला. तरीही त्याला पुढील सामन्यात संधी मिळणार आहे. कारण भारत हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून त्याला पुढे आणण्याच्या मानसिकतेत आहे. 

                  विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर भारताला या सामन्याद्वारे आपली प्रतिमा दुरूस्त करण्याची नामी संधी होती व ती टिम इंडियाने साधली देखील. रोहीत शर्मा -राहुल द्रविड युगाची विजयाने सुरुवात झाली. आश्चर्याची बाब म्हणजे विराट कोहलीला नेहमी हुलकावणी देणारी नाणेफेक रोहीत शर्मावर पहिल्याच प्रयत्नात फिदा झाली.

                  भारताने मिळविलेल्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या काही प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीवर एक प्रकाशझोतात टाकूया...

                    तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या सुर्यकुमार यादवने पहिल्यापासून आक्रमक खेळ करत चाळीस चेंडूत बासष्ठ धावा केल्या. शिवाय कर्णधार रोहीत शर्मा सोबत एकोणसाठ धावांची भागीदारी केली. याचे फळ त्याला सामनावीर पुरस्काराने मिळाले.

                    कर्णधार रोहीत शर्माने आपल्या ख्यातीला अनुसरून खेळ करत अठ्ठेचाळीस धावा केल्याशिवाय राहुल व सुर्या सोबत दोन अर्धशतकी भागिदाऱ्या करून संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. शिवाय नेतृत्वगुणाचा सुंदर अविष्कार करत कर्णधार म्हणून विजयी सलामी दिली.

                     रविचंद्रन आश्विनने आपल्या अनुभवाचा उपयोग करून किवीज फलंदाजांना बांधून ठेवत चार षटकात तेेवीस धावा देत दोन बळी मिळविले. मोठया धावसंख्येकडे वाटचाल करणाऱ्या न्यूझिलंडला एकाच षटकात दोन दणके देऊन आश्विनने भारताच्या विजयाचा पाया भरला.

                     अनुभवी वेगवान गोलंदाज भवनेश्वर कुमार आज आपल्या जुन्या लयीत दिसला. चेंडूला दोन्ही बाजूने स्विंग करत त्याने पहिल्या षटकातच किवीजला पहिला झटका दिला. त्याने चार षटकात चोवीस धावा देऊन दोन बळी घेत संघासाठी भरीव योगदान दिले.

                      रिषभ पंतने त्याचा नैसर्गिक खेळ केला नाही तसेच मोठी खेळीही केली नाही. परंतु सतरा चेंडूत सतरा धावा करताना शेवटपर्यंत नाबाद राहात विजयी चौकार मारत निसटू पाहणारा विजय मिळवून दिला.

लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

Email:  dattavighave@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या