ललित लेख- ओढ तुझी संपत नाही

 ललित लेख- ओढ तुझी संपत नाही



काय हो...आजचा दिवस आपण पुन्हा नव्याने जगलो नाही...बघता बघता लग्नाची पन्नास वर्षे उलटली.मला अजूनही ते दिवस आठवतात.त्यावेळी आपल्या वडीलांनी लग्न ठरवून,  बोलाचाली करून  मोकळे झाले आपल्या पसंतीचा विचारही केला नाही ना? नंतर सुपारी फोडायचा वेळी आपण एकमेकांना बघितले. सर्वांच्या नजरा चोरून एक कटाक्ष टाकला आणि काय सांगू मी माझी राहिलेच नाही...सतत तुमच्या विचारात मग्न..प्रेमरोग म्हणतात तो हाच असावा तेव्हा जाणवले..सतत धुंदीत असल्याप्रणाने माझी परिस्थिती.

"आई,औषध नल गे मजला" हे दमयंती का म्हटले असेल हे ही आत्ताच कळलं..! लग्न झाले आणि मी या घरात आली. सासू,सासरे ,दीर, नणंद अहो आज्जी सासू सुद्धा...अशा माणसांनी भरल्या घरात आले. ती आपली पहिली रात्र तर अजूनही आठवते..घरात एवढी मंडळी..माझ्या मनावर प्रचंड दडपण आले..हळूच हात हाती घेतलात तसा अंगावर शहारा आला ..केसातील मोगऱ्याची वेणी अलगत काढून बांधलेला अंबाडा सैल केलात ..मुलायम कुरळे कुंतल पाठीवर रुळू लागले..खट्याळ वारा जसा बटांशी खेळतो तशी तुमची बोटे मुलायम केसांना छेडू लागली तसा अंगावर आलेला काटा..नजरेला नजर भिडली आणि सुखाच्या चांदण्यात आकंठ न्हाऊन निघालो. पण माझ्या डोळ्याआड लपलेली भावना , माझ्या काळजात घालमेल तुम्हाला समजली आणि हात हाती घेऊन तुमच्या जवळ घेतले...प्रेमाचे गुज बोलता  तुमच्या कुशीत कधी झोपून गेली कळलंच नाही..पण तुमच्या कुशीत मला अनामिक सुख जाणवले,विश्वास,

आपलेपणा, एकमेकांना समजून घेण्याचा स्वभाव जाणवला आणि मी मनोमन  सुखसरींमध्ये  न्हाऊन निघाले..पुढे संसार सुरू झाला, आपल्या वेलीवर दोन फुलं ही उमलली.मुलांना मोठं करता करता आपले एकमेकांकडे थोडं दुर्लक्ष च झाले नाही पण तरीही मुलांचा डोळा चुकवून तुमच्या खोड्या आजही आठवल्या तर  मनातल्या मनातच मी ईश्श  म्हणते आणि मूलखाची लाजते.. नुसता लपंडाव चालायचा ना...आपल्या प्रेमाची रंगावली माझ्या मनाने रेखाटली..त्यात निरंतर प्रीतीचे चांदणे..अतूट विश्वासाचे रंग...मी आनंदाने भरले..सुबक नाही झाली तरी त्यात माझ्या मनाचं पावित्र्य नक्कीच आहे बरं..याची ग्वाही अंगणातील तुळस देतेय..बघा दिवस किती  भरकन सरतात. मुलं मोठी झाली, मोठं घर घेतले त्यांनी..अगदी सुख नांदतेय आपल्या घरी. आणि आजचं त्यांचे हे सरप्राईज गिफ्ट च म्हणूया आपल्या लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसादिवशी पुन्हा आपले लग्न लावून दिले.पुन्हा मुंडावळ्या, पुन्हा ती  हळद, पुन्हा सप्तपदी आणि मुलांनी चक्क पहिल्या रात्रीसारखी आपली रूम सजवली, ही फुलांची शेज ..मोगऱ्याचा सुगंध.. पुन्हा तो अंबाडा सैल झाला.. पुन्हा तुमचा स्पर्श माझ्या केसांमधून सळसळला..रोजचा  तरी नव्याने तूमचा सहवास जाणवला... अहाहा..!प्रेम व्यक्त करायला वयाची अट नसते हेच खरे.. खरंच हो आज सप्तपदी चालताना ते गाणं आठवले...

"सप्तपदी हे रोज चालते

तुझ्यासवे ते,

शतजन्मींचे हो, माझे

नाते"...

लग्नाची तीस वर्षे उलटली तरीही आज मी एक गोष्ट मात्र कबूल करते,... सख्या  ...ओढ तुझी संपत नाही.. ... असे बोलत पुन्हा  त्यांच्या कुशीत शिरली आणि कधी झोप लागली कळलेच नाही....


सौ.अनिता गुजर

ठाणे जिल्हाध्यक्षा

8097524197

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या