बांगलादेशला धुळ चारत स्कॉटलंडचा मोठा उलटफेर !
सातव्या टि२० विश्वचषक स्पर्धेला रविवारी ओमान मध्ये पात्रता फेरीच्या सामन्याने सुरुवात झाली. कसोटी दर्जा प्राप्त बांगलादेश व श्रीलंका मुख्य स्पर्धेत खेळ्यासाठी थेट पात्र न झाल्याने त्यांच्यावर पात्रता सामने खेळण्याची वेळ आली आहे. टि२० सामन्यात कागदोपत्री कोणताही संघ प्रबळ असला तरी मैदानावर तो जिंकेलच असे नाही. जो संघ प्रत्यक्ष सामन्यात परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आपले कौशल्य सिद्ध करील तो संघच विजयी ठरतो.
असाच एक सामना पात्रता फेरीतील ब गटात ओमानच्या कल अमिरात क्रिकेट ग्राऊंडवर झाला. मायदेशात फिरकीला धार्जिण्या खेळपट्टयांवर ऑस्ट्रेलियाला ४-१, न्यूझिलंडला ३-२ व झिंबाब्वेला २-० असे लोळवून विश्वचषकाच्या स्वारीवर गेलेल्या बांगलादेशच्या कागदी वाघांना स्कॉटलंडच्या जिगरबाज संघाने अक्षरशः फाडून खाल्लं.
या सामन्यापूर्वी झालेल्या दोन सराव सामन्यात स्कॉटलंडने विजय मिळवले तर बांगलादेश पराभूत होऊन खेळायला उतरले. पण बांगलादेशच्या संघाला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव मोठा असल्याने ते स्कॉटलंडला सहज चिरडतील अशी अपेक्षा होती. अगदी त्याचप्रमाणे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्कॉटलंडची सुरुवात झाली. त्यांचे पहिले सहा फलंदाज अवघ्या त्रेपन्न धावांत बाद झाल्याने बांगलादेश स्कॉटलंडला स्वस्तात गुंडाळतील असे वाटत असतानाच स्कॉटलंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस गिव्हजने चमत्कारीक खेळ केला. प्रथम त्याने मार्क वॅट व नंतर जोश डेव्हेच्या मदतीने संघाचा डाव सावरत स्कॉटलंडला २० षटकात ९ बाद १४० अशी सन्मानजनक धावसंख्या उभी करून दिली व गोलंदाजीतही अप्रतिम मारा करताना बांगलादेशला २० षटकात ७ बाद १३४ असे रोखून सहा धावांचा छोटा दिसत असला तरी मोठा विजय मिळवून बांगलादेशला अतिशहाणचे बक्षिस दिले. अर्थात सामनावीर पुरस्काराचा मानकरी ४५ धावा करणारा व २ बळी घेणारा ख्रिस ग्रिव्हज हाच ठरला.
बांगलादेश या सामन्यासह उर्वरीत तीन सामने सहज जिंकून बारा संघाच्या मुख्य स्पर्धेत प्रवेश मिळविल असा सर्वांचाच अंदाज होता. पात्रता फेरीत ब गटात अव्वल स्थानी राहाणारा संघ मुख्य स्पर्धेच्या ब गटात सामील होणार आहे. भारताचा संघही ब गटात असल्यामुळे बांगलादेश संघ पात्रता फेरीत अव्वल स्थानी राहून भारताच्या गटात येईल असे वाटत होते. परंतु स्कॉटलंडने बांगलादेशचा काटा काढल्याने व त्यांचा सध्याचा फॉर्म बघता ब गटातून स्कॉटलंडच अव्वल स्थानी राहण्याची शक्यता आहे. याच ब गटात यजमान ओमानचा संघ असून त्यांनीही आपल्या पहिल्या सामन्यात पापू न्यु गिनीचा एकतर्फी सामन्यात दहा गडी राखून पराभव केला असल्याने त्यांचाही आत्मविश्वास दुणावला असणार तसेच ते स्थानिक असल्याने यजमान पदाचा व वातावरणाचा लाभ त्यांना मिळणार हे शंभर टक्के सत्य आहे. जर बांगलादेशने त्वरीत आपल्या खेळात सकारात्मक बदल घडविला नाही तर त्यांचे मुख्य विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगू शकते.
आशिया खंडातील दुसरा वाघ श्रीलंकन टायगर्स म्हणजे श्रीलंकेचा संघही विश्वचषकासाठी थेट पात्र न ठरल्याने त्यांच्यावरही पात्रता फेरी खेळण्याची पाळी आली आहे. त्यांनाही डोळ्यात तेल घालून खेळ करावा लागेल अन्यथा आयसीसीचे सहसदस्य देश असलेले इतर संघच आपल्याला मुख्य स्पर्धेत खेळताना दिसतील.
कोरोना संसर्गामुळे ही स्पर्धा भारताऐवजी युएई आणि ओमानमध्ये होत आहे. स्पर्धेची सुरुवात पात्रता फेरीने झाली आहे. या पात्रता फेरीत दोन ग्रुप आहेत. ग्रुप ए मध्ये आयर्लंड, नेदरलँड, श्रीलंका आणि नामिबिया तर ग्रुप बी मध्ये ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड आणि बांगलादेश हे संघ आहे. दोन्ही ग्रुपमधील गुणतालिकेतील अव्वल दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरतील.
मुख्य स्पर्धेची सुरुवात सुपर १२ फेरीने होईल. यात दोन ग्रुप असून ए मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पात्रता फेरीतील दोन संघ असतील. तर बी ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पात्रता फेरीतील दोन संघ असतील.
ग्रुप ए मधील पहिली लढत अबुधाबी मैदानावर २३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होईल. तर अखेरची लढत ६ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीने होईल.
ग्रुप बी मधील पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्या लढतीने होईल. ही लढत दुबईत होणार आहे. या ग्रुपमधील अखेरची लढत देखील भारताच्या सामन्याने होणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी भारत पात्रता फेरीतील दुसऱ्या क्रमांकाच्या संघासोबत लढेल.
१० नोहेंबरला पहिला उपांत्य सामना, ११ नोव्हेंबरला दुसरा उपांत्य सामना तर १४ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

0 टिप्पण्या