शार्दूलच्या चमत्कारीक कामगिरीमुळे सीएसके बनले विजेते !

 



               विजयदशमीच्या पावन दिनी चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान मोडीत काढत आपले चौथे विजेतेपद पटकविले. सध्या चेन्नईपेक्षा फक्त मुंबई इंडियन्सच पाच विजेतेपद मिळवून पुढे आहे. मागच्या वर्षी याच युएईच्या मैदानावर खेळताना सीएसकेचा संघ तळाला राहीला होता. परंतु अल्पावधीतच संघातील त्रुटी दूर करत सीएसकेने चमत्कार घडविला.

                शुक्रवारी रात्री दुबई इंटरनॅशनल स्टेडीयमवर नाणेफेक गमावूनही धोनीने सामना जिंकून केकेआरला जोरदार झटका दिला. चेन्नईच्या विजेतेपदात सर्वात प्रमुख भूमिका बजावली ती त्यांच्या सलामीवीरांनी. महाराष्ट्राचा ऋतूराज गायकवाड ६३५ व फाफ ड्यू फ्लेसिस ६३३ धावा यांनी सीएसकेचा पाया भक्कम राहील याची दखल घेतली. हाच मजबूत पाया सीएसकेला विजेतेपदचा कळस गाठण्यात कामी आला.

                ऋतुराज व फाफच्या धावात अवघ्या दोन धावांचे अंतर होते, त्यामुळे स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणाऱ्यांसाठी असलेली " ऑरेंज कॅप " ऋतूराजला मिळाली. त्याचबरोबर भारताकडून अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळल्यामुळे या भरीव कामगिरीसाठी त्याला " इमर्जिंग प्लेअर " हा पुरस्कारही मिळाला.

                प्रथम फलंदाजी करताना सीएसकेची सुरूवात चांगली झाली. ऋतूराज ३२ व रॉबीन उथप्पाने ३१ धावांची धमाकेदार खेळी केली तर फाफ ड्यू फ्लेसिसने शेवटपर्यंत किल्ला लढवत ८६ धावांची खेळी साकारली. या जोरावर सीएसकेने ३ बाद १९२ धावा ठोकल्या.

               कागदोपत्री या धावा फार मोठया दिसत असल्या तरी केकेआरचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर व शुभमन गिलने ९१ धावांची सलामी देत विजयाकडे जोरदार वाटचाल केली. दरम्यान या दोघांनी सीएसकेच्या सगळ्याच गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. त्यातच कर्णधार धोनीने तुफान फॉर्मातील अय्यरचा झेल सोडून स्वतःच्या हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतली. शिवाय इतर क्षेत्ररक्षकांनी झेल घेण्याच्या व धावबाद करण्याच्या सोप्या संधी दवडल्या. त्यामुळे सीएसकेच्या संकटात वाढ होत होती.

               नेमका त्याच वेळी कर्णधार धोनीने गोल्डन आर्म असलेल्या शार्दूल ठाकूर कडे चेंडू सोपविला. या सत्रात सीएसकेकडून सर्वाधिक २१ बळी घेणाऱ्या शार्दूलने प्रथम अय्यर व त्याच षटकात नितिश राणाला शुन्यावर बाद केले. त्यामुळे चेन्नईच्या इतर गोलंदाजांनाही जोर आला. त्यानंतर नारायण २, मॉर्गन ४, कार्तिक ९, साकिब ०, त्रिपाठी २ लगोलग बळी पडल्याने केकेआरच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या होत्या. शेवटी शिवम मावी व लॉकी फर्ग्युसनने बॅट फिरविण्याचा प्रयत्न केला. अखेर वीस षटकात ९ बाद १६५ धावांवर केकेआरचे ताबूत थंडावले.

               केकेआरचे सलामीवीर त्रासदायक ठरत असताना शार्दूल ठाकूरने सामन्याला कलाटणी देताना एकाच षटकात दोन गडी बाद केले. शिवाय सामन्यात एकंदर तीन फलंदाज त्याने तंबूत धाडले. खऱ्या अर्थाने शार्दूलच सामन्याचा गेम चेंजर होता. मात्र सामन्यानंतर त्याला कुठलेही अवॉर्ड मिळाले नाही. सामनावीर पुरस्कार मिळालेल्या फाफ ड्यू फ्लेसिसला गेमचेंजर पुरस्कार मिळाला. फाफची ८६ धावांची खेळी निर्णायक होती ते अगदी खरे, परंतु त्या संकटसमयी ठाकूरने ते दोन बळी घेतले नसते तर फाफची ती खेळी निरर्थक ठरली असती. पुरस्कार निश्चित करणारी मंडळी ही अशा प्रकारे गोंधळ निर्माण करते.  तरी अशा तांत्रिक कमिटीने परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून पुरस्कार्थींची निवड करावी. अन्यथा गुणी खेळाडूंचा आत्मविश्वास ठेचला जाऊ शकतो.

               सीएसकेच्या दैदिप्यमान यशाबद्दल संपूर्ण संघ, कर्णधार, सपोर्टींग स्टाफ व त्यांच्या हितचिंतकांचे दिलखुलास अभिनंदन !!!


लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

Email:  dattavighave@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या