अध्यासने ही लोकासने झाली पाहिजेत



मुंबई (विश्वनाथ पंडित) वाचकाला खिळवून ठेवणारी भाषा आणि पुस्तक पूर्ण वाचण्यास प्रवृत्त करणारे लेखन झाले पाहिजे. आपण फक्त काव्य किंवा अभंग वाचतो. परंतु ती काव्य कशा प्रकारे आणि कोणत्या काळात झाली, त्याकाळातील समाजकारण, धर्मकारण अशा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास हा अध्यासनात केलेला असतो. म्हणून अध्यासने ही लोकासने झाली पाहिजे. जेव्हा संतांवरील  लेखन, पुस्तके पुढे येतील आणि संत हे पुस्तकांतून लोकांमध्ये मिसळतील तेव्हा अध्यासने ही लोकासने होतील, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत नामदेव अध्यासन व नामदेव समाजोन्नती परिषद, शाखा पुणे शहर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज व संत जनाबाई यांच्या ६७१ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कसबा पेठेतील श्री समस्त नामदेव शिंपी दैव मंडळाच्या नामदेव मंदिरात ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. डॉ. सुमंगला बाकरे लिखीत श्री संत जनाबाई या ग्रंथाचे प्रकाशन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, नामदेव समाजोन्नती परिषदचे अध्यक्ष संजीव तुपसाखरे, लेखिका डॉ. सुमंगला बाकरे, नामदेव समाजोन्नती परिषदेचे माजी मुख्य विश्वस्त तु.पां. मिरजकर,  पुणे विभागाचे उपाध्यक्ष संजय नेवासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्राचे संचालक डॉ. समीर सहस्त्रबुद्धे, शिल्पकार विवेक खटावकर, श्री समस्त नामदेव शिंपी दैव मंडळाचे अध्यक्ष रमेश मेहेर, नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर अध्यक्ष संदिप लचके, मान्यवरांच्या हस्ते झाले. नामदेव समाजोन्नती परिषदेचे मुख्य विश्वस्त रामभाऊ मेटे, विश्वस्त ज्ञानेश्वर पाटसकर, विश्वस्त वसंतराव खुर्द, दिंगबर क्षीरसागर, दिलीप वायचळ, सौ. वृषाली तुपसाखरे, सौ. वासंती रहाणे,  गायत्री मिरजकर तसेच कसबा पेठ नामदेव मंदिराचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी  व इतर बहुसंख्य मान्यवर हजर होते. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर शाखेचे विभागीय उपाध्यक्ष प्रदिप खोले, उपाध्यक्ष, रणजित माळवदे, तसेच सल्लागार सुभाष पांढरकामे, अरूण काळे, रमेश हिरवे, तसेच  राहुल सुपेकर , विजय कालेकर, दुर्गेश खुर्द, दिनेश सुपेकर, नितीन लचके, रजनीकांत निखळ, अक्षय मांढरे, नामदेव अध्यासनाचे सहकारी अंकुश हेद्रे, दिनकर पतंगे आदी मान्यवरांनी सहकार्य केले. 

यावेळी संत नामदेव महाराज यांचे अभ्यासक व संत नामदेव अध्यासनाचे शैक्षणिक सल्लागार डाॅ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक यांनी मराठीत अनुवाद केलेली संत नामदेवांची सार्थ गाथा या ग्रंथाचे पुणे विद्यापीठातर्फे प्रकाशन होणार आहे. नामदेव समाजातील बांधवांनी याकरीता आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन डॉ. सदानंद मोरे यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नामदेव समाजोन्नती परिषदेचे वतीने ११ हजार रुपयांची देणगी अध्यक्ष संजीव तुपसाखरे जाहीर केले. तसेच कार्यक्रमप्रसंगी डाॅ.  सदानंद मोरे, डॉ. सुमंगला बाकरे , ना.स.प. अध्यक्ष संजीव तुपसाखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संगीता मावळे यांनी  केले तर ना.स.प. पुणे शहराचे मुख्य समन्वयक प्रशांत सातपुते यांनी प्रास्ताविक केले आणि ना.स. प. पुणे शहराचे सचिव सुभाष मुळे यांनी आभार मानले.


विश्वनाथ पंडित, जेष्ठ वृत्तपत्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या