अनलॉकची घोषणा काही क्षणांतच CMO ने फेटाळली; त्यानंतर पुन्हा वडेट्टीवार आले अन् म्हणाले..





प्रतिनिधी : प्रविण बेटकर

मोबा.-९५९४४०१९२२

डोंबिवली (ठाणे)

मुंबई: राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला होता. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. परंतु तासभरातच राज्यातील निर्बंध उठवण्यात आले नाहीत आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडसची उपलब्धता यावरून निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील असं अवघ्या काही मिनिटांतच शासनाद्वारे सांगण्यात आलं.

विजय वडेट्टीवार यांनी केलेली घोषणा शासनाकडून फेटळण्यात आल्यानंतर काही मिनिटांनी पुन्हा ते माध्यमांसमोर आले. राज्य सरकारमध्ये कुठलीही गफलत नाही. अनलॉकच्या ५ लेव्हलला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं म्हणत वडेट्टीवार घूमजाव केला आहे.




विजय वडेट्टीवार म्हणाले की, एचडीएमएने पाच लेव्हल ठरवल्या, त्याला मान्यता मिळाली आहे. लॉकडाऊन लादणे हे सरकारचं काम किंवा जबाबदारी नाही. ज्या भागातील जनतेने सहकार्य केले त्या भागातील लॉकडाऊन कमी करायचा हे धोरण ठरवलं. राज्य सरकारमध्ये कुठलिही गफलत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत अनलॉकच्या ५ लेव्हला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन काढायचं असं ठरलं, तत्वता मान्यता मिळाली आहे. मात्र अंतिम आदेश मुख्यमंत्री घेतील, असं स्पष्टीकरण देखील विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे.

तत्पूर्वी, राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी ५ टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता २५ टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली होती. पहिल्या टप्प्यामध्ये १८ जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. 


राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत-

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असं शासनानं स्पष्ट केलं आहे.

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल. तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते शासननिर्णया द्वारे स्पष्ट करण्यात येईल, असंही शासनानं स्पष्ट केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या