प्रतिनिधी: अवधुत सावंत
लसीकरण केंद्रांवर राजकीय जाहिरातींना मनाई अन्यथा मान्यता रद्द करण्याचा पालिका आयुक्तांचा इशारा..
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रांबरोबरच शासकीय तसेच खासगी किंवा औद्योगिक लसीकरण केंद्राबाहेरही राजकीय पक्षांचे फलक, जाहिराती, भित्तीचित्रे लावण्यास पालिका प्रशासनाने मनाई केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल, असाही इशारा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे.
पालिकेच्या लसीकरण केंद्रावर कोणत्याही पक्षाने जाहिरात करणारी किंवा श्रेय घेणारी फलकबाजी लावू नये असे आदेश पालिका आयुक्तांनी काढले होते. मात्र गेल्या दहा दिवसात त्यात काही फरक पडला नाही.
अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांच्या बाहेर राजकीय फलक दिसत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी पुन्हा एकदा परिपत्रक काढून राजकीय फलकबाजी बंद करण्याचा इशारा दिला आहे. आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे सतत उल्लंघन होत असल्यामुळे आयुक्तांनी अधिक कडक मार्गदर्शक सूचना लसीकरण केंद्रांना आखून दिल्या आहेत.
राजकीय फायद्यासाठी अशा जाहिराती करणे उचित नाही, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. पालिका, शासकीय अथवा खासगी लसीकरण केंद्र, तसेच औद्योगिक संस्था (विविध कंपन्या व कार्यालये) व गृहसंकुल येथेही खासगी लसीकरण उपकेंद्रांवर राजकीय जाहिराती, भित्तिपत्रे लावण्यास मनाई करण्यात आली आहे. काही लोकप्रतिनिधी खासगी लसीकरण केंद्र आणि गृहनिर्माण संस्था व खासगी कंपन्या यांच्यात समन्वय साधून श्रेय घेत आहेत. त्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केला आहे.


0 टिप्पण्या