कल्याण-डोंबिवलीकरांवरील ६०० रुपये करवाढ अन्यायी ...

 कल्याण-डोंबिवलीकरांवरील ६०० रुपये करवाढ अन्यायी ...  



खासदार कपिल पाटील यांच्याकडून स्थगितीची मागणी


डोंबिवली ( शंकर जाधव )  कोरोना आपत्तीच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक स्थिती बिकट असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेने आकारलेली घनकचरा व्यवस्थापनात शुल्कातील प्रती फ्लॅट ६०० रुपयांची करवाढ अन्यायकारक आहे. या करवाढीला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

कोरोना आपत्तीच्या दुसऱ्या लाटेतून हळूहळू बाहेर पडत असतानाच, महापालिकेने अचानकपणे घनकचरा व्यवस्थापन शुल्कात प्रती फ्लॅट ६०० रुपयांची वाढ केली आहे. याबाबत नागरिकांना कोणतीही पूर्वसुचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे या दरवाढीने नागरिकांना नाहक भूर्दंड सहन करावा लागणार आहे, याकडे खासदार कपिल पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महापालिकेचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांचे लक्ष वेधले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून अद्यापि अनेक सोसायट्या वा चाळींमधील कचरा उचलला नाही. अनेक ठिकाणी घंटागाडी पोहचत नाही. अशा परिस्थितीत घनकचरा व्यवस्थापन शुल्कात करण्यात आलेली वाढ चुकीची आहे. त्यातच कोरोनाच्या आपत्तीमुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे या करवाढीला तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणीही खासदार कपिल पाटील यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या