कोरोना च्या प्रादुर्भावाचा फटका.. महाविद्यालयीन प्रवेशांत घट..
प्रतिनिधी: अवधुत सावंत
मुंबई आणि परिसरातील महाविद्यालयांना कोरोना प्रादुर्भावाचा फटका बसल्याचे दिसण्यात येत असून यंदा शहर आणि उपनगरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशात घट दिसून येत आहे.
यंदा बारावीचा निकाल घसघशीत लागल्यामुळे प्रत्यक्षात प्रथम वर्षाच्या प्रवेशात वाढ होण्याची शक्यता होती.
मात्र, प्रत्यक्षात यंदा मुंबई आणि उपनगरांतील महाविद्यालयीन प्रवेश घटल्याचे दिसत आहेत.
विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी गेल्या वर्षी (२०१९-२०) मुंबई शहरातील महाविद्यालयांमध्ये ६५ हजार ३४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.
यंदा (२०२०-२१) मात्र ५२ हजार ६७३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतल्याचे दिसत आहे.
उपनगरांतील महाविद्यालयांमध्येही प्रवेश घटले आहेत.
गेल्यावर्षी उपनगरांतील महाविद्यालयांमध्ये ५१ हजार ७२२ प्रवेश झाले होते तर यंदा ४४ हजार ३६८ प्रवेश झाले आहेत.
अधिसभा सदस्य आरती प्रसाद यांनी विचारलेल्या प्रश्नाला विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या उत्तरातून ही माहिती पुढे आली आहे.
प्रवेशात घट का ??
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या.
त्यामुळे शुल्क भरण्यापासून कुटुंबांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लगत आहे.
त्याचा परिणाम प्रवेशावर ही झाला असल्याचे निरीक्षण प्राचार्यांनी नोंदवले आहे.
त्याचप्रमाणे राज्यातील इतर भागांतून आणि परराज्यातून मुंबईत शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची कोरोना मुळे संख्याही कमी झाली आहे.
त्यामुळे प्रवेशात घट दिसत आहे.
‘आर्थिक कारण हे प्रवेश कमी होण्यामागील प्रमुख कारण आहे.
प्रामुख्याने विनाअनुदानित महाविद्यालयांमधील प्रवेशांत अधिक घट असण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे अजून वसतिगृहे सुरू झालेली नाहीत.
यामुळेच बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झालेली आहे असे सांगण्यात आले.


0 टिप्पण्या