कविता-चिमण्या (कवी प्रदीप कासुर्डे)

  कविता-चिमण्या



आजी सांगायची गोष्ट 

चिमणीचं घर मेणाचं 

कावळ्याचं घर शेणाचं 

चिऊताई चिउताई दार उघड 

आज माझी आईं 

माझ्या मुलीला  कोणती गोष्ट सांगेल ?

आई म्हणायची गाणं 

एक घास चिउचा 

एक घास काऊचा 

आज माझी बायको 

मुलीसाठी कोणतं गाणं म्हणेल ? 

बहिणाबाईंच्या कवितेत 

आम्ही वाचायचो

अरे खोप्यामधी खोपा 

सुगरणीचा चांगला 

देखा पिल्लासाठी तिने 

झोका झाडाले टांगला 

आज आमची मुलं 

कोणत्या कविता वाचतील ?

आज कुठे आहेत चिमण्या 

लेकींप्रमाणे माहेरी तर गेल्या नाहीत ना?


कवी प्रदीप कासुर्डे

नवी मुंबई

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या