कथा-आंतरराष्ट्रीय महिला दिवस
औषधशास्त्र विभाग, के इ एम हॉस्पिटल, परेल
1994 साली सिंधुदुर्गच्या दोन मुलांना के इ एम हॉस्पिटल आणि जी एस मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला. अमोल झांट्ये, मालवण आणि मी कणकवली नरडवेचा. अमोल आता मालवणला बालरोगतज्ज्ञ आहे.
आम्ही के इ एम ला प्रवेश मिळालेली मुले आपापल्या शाळेत राजा होतो. के इ एम ला मात्र आमच्यापेक्षा सरस मुले होती . त्यापैकी आम्ही एक होतो.
आम्ही गावातील मराठी मेडियम मधली मुले MBBS ची मोठमोठी जाडी इंग्लिश पुस्तके पाहायचो आणि हबकून जायचो.
होस्टेलला आम्हाला काही सिनिअर मिळायचे. कोण सात वर्षे, कोण आठ वर्षे MBBS चे पहिले वर्ष पासच होत नसायचा. ही मुले बारावीला टॉपर असायची पण इथे येऊन खूप मागे पडायची.
मी पण मागे पडणार या भीतीने दररोज लायब्ररीत बसून अभ्यास करायचो. पण पहिल्या सहामाहित दोन गोष्टी घडल्या.
माझ्याबरोबर लायब्ररीत बसून अभ्यास करणारा आणि नायगाव होस्टेलला राहणारा माझा एक जवळचा मित्र अचानक गायब झाला. कोण म्हटले तो कॉलेज सोडून हरे कृष्णा मंदिरात ब्रह्मचारी झाला आहे. पण नक्की काही कळले नाही. तो कोणाला सांगून गेला नाही. आतापर्यंत तो मला भेटला नाही.
दुसरी गोष्ट अशी झाली की मला anatomy शरीरशास्त्र या विषयाच्या प्रॅक्टिकलसाठी बरेच diagrams दिले होते. ते लाल निळ्या पेन्सिलीने काढायचे diagrams मी एका मॅडमना दाखवले. त्यांना त्या आकृत्या आवडल्या नाहीत. त्या मॅडम माझ्यावर खूप भडकल्या. माझ्या सर्व diagram वर त्यांनी मोठ्या काट मारल्या आणि मला म्हणाल्या की MBBS तुला काही जमणार नाही.
त्या दिवशी मी हबकलो. मलापण वाटू लागले की आपल्याला MBBS जमणार नाही. त्या मुलांसारखे मी पण MBBS पास होणार नाही, असे मला वाटू लागले.
मी लायब्ररीत बसायचे सोडले. इंग्लिश कादंबरी घेऊन रात्र रात्र वाचू लागलो. सकाळी सहा वाजता झोपायचो आणि कॉलेजला दांडी मारायचो.
मला कोणत्याच परीक्षेला बसायची भीती वाटू लागली. माझा रूम पार्टनर कैलास पवार मी परीक्षा द्यावी म्हणून मला समजवायचा. पण मी परीक्षा देत नव्हतो.
फर्स्ट MBBS ची परीक्षा मी सहा महिने उशिराने दिली. त्यात मला चांगले मार्क्स मिळाले.
आम्हाला फिसीओलॉजीला डॉ श्रीनिवास कशाळीकर सर होते. ते सावंतवाडीचे. ते छान मराठी पुस्तक लिहीत. त्यांचे एक पुस्तक मला आवडले म्हणून मी त्यांना निनावी चिठ्ठी पाठवली. सर खुश झाले आणि सगळ्या वर्गात तुमच्यापैकी एका विद्यार्थ्याने मला चांगला अभिप्राय दिला आहे त्याबद्दल धन्यवाद, असे उद्गार काढले.
1996 ला मी सेकंड MBBS ला आलो. औषधशास्त्राला शरदिनी डहाणूकर मॅडम विभागप्रमुख होत्या. त्यापण छान पुस्तके लिहीत. उर्मिला थत्ते मॅडम, नित्या गोगटे मॅडम, ऐनापुरे सर पण होते.
माझे कॉलेजला दांड्या मारणे चालूच होते. मी मनाला आले तर कॉलेजला जायचो नाहीतर नाही.
एके दिवशी मला फार्मकॉलॉजि च्या मांजरेकर मॅडम आणि त्रिपाठी मॅडमनी खास बोलावून घेतले. मला विचारले तू का दांड्या मारतोस?. मी आपला गप्प. मग प्रेमाने माझी विचारपूस केली.
"के इ एम हे मोठे कॉलेज आहे. इथे कोणाला सहज प्रवेश मिळत नाही. तुला मिळाला आहे. तो तू आता फुकट घालवू नकोस. शिवाय तुला चांगले मार्क्स असतात. तू कोणतीही परीक्षा चुकवू नकोस."
के इ एम च्या कॉलेज बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर दोन्ही मॅडमनी मला समोर स्टुलावर बसवून अर्धातास तरी प्रेमाने समजावून सांगितले. तुला जमेल असा विश्वास दिला. त्यानंतर मी कोणतीच परीक्षा बुडवली नाही.
पुढे मांजरेकर मॅडमना PhD मिळाली. तेव्हा माझा मित्र अमोल पवार ( आता MD Medicine चेंबूर मोठा डॉक्टर आहे) मला म्हणाला, सतीश तुझ्या मांजरेकर मॅडमना भेटून अभिनंदन कर. पण माझ्यात तसे डेरिंग नव्हते.
मी थोडा मागे पडलो. पण MBBS झालो. DMRE झालो याचे थोडे किंवा बरेच श्रेय मांजरेकर मॅडम आणि त्रिपाठी मॅडमनी माझा जो अर्धा तास क्लास घेतला त्याला नक्की आहे.
या दोन्ही मॅडम कुठे आहेत, मला माहित नाही. मी त्यांच्या लक्षात असणे शक्य नाही. पण आज 24 वर्षानंतर पण मॅडम माझ्या लक्षात आहेत आणि राहतील.
खूप आभार आणि महिला दिनाच्या शुभेच्छा!
डॉ सतीश सदाशिव पवार
कणकवली
08 मार्च 2021
0 टिप्पण्या