कविता : गाडगेबाबा

कविता :  गाडगेबाबा




थोतांडाची फोडी गाडगी

अज्ञानाच्या पिरगळी सोंडी


समानतेचा देऊनी नारा

थोपविल्या पाखंडी झुंडी


दगडात देव नाही

देव माणसाच्या ठायी


जळमटे अन्यायाची

झाडू मारुनी सफाई


नको दारू, वाया कर्ज

नको पाळू जाती पाती


कापू नको कोंबे बकरी

कीर्तनात बाबा गाती


तुकोबांचे बोल, बाबा

दिली समाजाला जाग


जुन्या पाचोळ्याला आग

केली गुलाबाची बाग



© डॉ सतीश पवार

कणकवली 8108751520

23 फेब 19



संत गाडगेबाबा

बाबासाहेब आंबेडकर म्हणतात," महात्मा फुलेंनन्तर सगळ्यात मोठा लोकसेवक म्हणजे संत गाडगेबाबा".

त्यांचे खरे नाव डेबूजी झिंगरोजी जानोरकर. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 23 फेब 1876 ला झाला. ते गावागावात फिरायचे आणि साफसफाई करायचे. लोक त्यांना पैसे देत. त्यातून त्यांनी शाळा, धर्मशाळा, हॉस्पिटल आणि प्राणी निवारा बांधले.

ते कीर्तन करत. त्यातून माणुसकी आणि भूतदयेचा संदेश देत. अंधश्रध्दा आणि कर्मकांडावर टीका करत. आपल्या प्रवचनात संत कबिराचे दोहे वापरत.  

ते लोकांना सांगत दारू पिऊ नका. देवाला कोंबे बकरी देऊ नका. मेहनत, साधे रहाणे आणि गरिबांसाठी त्याग याचा ते संदेश देत.

त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव होता. त्यांनी पंढरपूरची होस्टेलची बिल्डिंग बाबासाहेबाना दान केली. लोकांना ते बाबासाहेबांचे उदाहरण देत. " बघा, बाबासाहेब मेहनत करून किती शिकले आहेत. गरिबांची मुले पण आपल्या कष्टाने शिकू शकतात".

20 डिसेंम्बर 1956 साली गाडगेबाबांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता मोहीम 2000-01 ला महाराष्ट्र राज्य सरकारने चालू केली. अमरावती  विद्यापीठाला त्यांचे नाव दिलेले आहे.


डॉ सतीश सदाशिव पवार

कणकवली

22 फेब 2021 (साभार : विकिपीडिया)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या