मुंबईत अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते ‘वर्तुळ’ दिवाळी अंकाचे दिमाखदार प्रकाशन.



मुंबई, प्रतिनिधी. दिनांक : १ नोव्हेंबर २०२६

साहित्य, संस्कृती आणि सामाजिक जाणीवांचा सुंदर संगम असलेल्या ‘वर्तुळ दिवाळी अंक २०२६’ चे प्रकाशन रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील गोरेगाव येथे ‘मुंबई मित्र’ या वर्तमानपत्राच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. या प्रकाशन सोहळ्याला साहित्यप्रेमी आणि शब्द शंकरपाळी साहित्य समूहाच्या सदस्यांची विशेष उपस्थिती लाभली.


या दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रमुख अतिथी, धडक कामगार युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ‘मुंबई मित्र’ वर्तमानपत्र समूहाचे संपादक आणि सर्वांचे लाडके लोकनेते माननीय श्री. अभिजीत राणे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शब्द शंकरपाळी साहित्य समूहातर्फे अभिजीत राणे साहेब यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन होणे ही संपूर्ण समूहासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब ठरली.



या सोहळ्याला शब्द शंकरपाळी साहित्य समूहाचे संस्थापक आणि ‘वर्तुळ’ दिवाळी अंकाचे संपादक माननीय श्री. भूषण सहदेव तांबे यांच्यासह सहसंपादिका ऍड.शलाका कोठावदे, तसेच समूहाचे सदस्य श्री. सारंग सबनीस, कु. अंकिता चव्हाण, श्रीमती मृगनयना भजगवरे, कु. सृष्टी कोठावदे, रीना आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.


‘वर्तुळ’ दिवाळी अंक २०२६ हा केवळ एक दिवाळी अंक नसून विविध साहित्यिकांच्या लेखणीला व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एक साहित्यिक उपक्रम आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतील तसेच देशाबाहेरील साहित्यिकांनीही या अंकात आपला सहभाग नोंदविला आहे. कविता, कथा, लेख आणि विविध साहित्यप्रकारांच्या माध्यमातून साहित्यविश्वातील वैविध्यपूर्ण विचारांना या अंकात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या अंकाच्या प्रकाशनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात माननीय अभिजीत राणे साहेब यांनी उपस्थित सदस्यांशी आणि संपादकांशी साहित्य क्षेत्रासंदर्भात मनमोकळी चर्चा केली. साहित्यनिर्मिती, साहित्यिकांचे योगदान आणि नवोदित लेखकांना मिळणारी संधी अशा विविध विषयांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी संपादक भूषण सहदेव तांबे यांनी ‘वर्तुळ’ दिवाळी अंकाची संकल्पना, त्यामागील भूमिका, अंकाची वैशिष्ट्ये तसेच शब्द शंकरपाळी साहित्य समूहाचा आजपर्यंतचा साहित्यिक प्रवास थोडक्यात मांडला. या उपक्रमाला दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांनी अभिजीत राणे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले.


समारोपप्रसंगी अभिजीत राणे साहेब यांनी संपूर्ण शब्द शंकरपाळी साहित्य समूहाला आणि ‘वर्तुळ’ दिवाळी अंकाच्या संपूर्ण टीमला दीपावली व नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. एकंदरीत, मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा प्रकाशन सोहळा आनंद, उत्साह आणि साहित्यिक जिव्हाळ्याने भारलेला होता. अभिजीत राणे साहेब यांच्या शुभहस्ते झालेला ‘वर्तुळ’ दिवाळी अंकाचा हा प्रकाशन सोहळा शब्द शंकरपाळी साहित्य समूहाच्या साहित्यिक वाटचालीतील एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षण ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या