राजापूर : प्रतिनिधी
राजापूर तालुक्यातील कोतापूर घुमेवाडी येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सुयोग्य रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोतापूरचे माजी सरपंच विजय परशुराम सुतार यांच्यासह काही ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता कोतापूर ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी संबंधित प्रशासनाकडे सादर केले आहे. कोतापूर घुमेवाडी स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, घुमेवाडी तसेच सुतारवाडी परिसरातील मृत व्यक्तींवर अनेक वर्षांपासून याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. पूर्वी या ठिकाणी जाण्यासाठी पायवाट उपलब्ध होती. मात्र, काही काळापूर्वी झालेल्या भूस्खलनामुळे ही वाट मोठ्या प्रमाणात खचून गेली. परिणामी मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेणे हे ग्रामस्थांसाठी अत्यंत कष्टाचे आणि धोकादायक ठरत आहे.
स्मशानभूमी जाण्यासाठी योग्य रस्ता निर्माण व्हावा, यासाठी माजी सरपंच विजय सुतार गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. याच मागणीसाठी त्यांनी २५ मे २०२६ रोजी सरपंच, ग्रामपंचायत कोतापूर यांच्याशी लेखी पत्रव्यवहारही केला होता. मात्र, ज्या जागेतून रस्ता जाणार आहे त्या जागामालकांची संमती घेऊन येण्याचे ग्रामपंचायतीकडून त्यांना सांगण्यात आले. मात्र, हा रस्ता ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील विषय असल्याने संबंधित जागामालकांशी ग्रामपंचायतीनेच चर्चा करून पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सुतार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यासाठी जागामालकांची स्वतंत्र भेट घेणे किंवा ग्रामसभेची विशेष बैठक आयोजित करून घुमेवाडी व सुतारवाडीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत या विषयावर निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्वतः वैयक्तिकरित्या जागामालकांकडे जाऊन संमतीपत्र मागणे योग्य नसल्याचेही त्यांनी ग्रामपंचायतीला यापूर्वी कळविले आहे.
विजय सुतार यांनी कोतापूर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून पाच वर्षे काम केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा अनुभव असतानाही सध्याच्या प्रशासनाकडून आपल्याला अत्यंत वाईट अनुभव येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी घुमेवाडीतील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी मृतदेह स्मशानभूमीकडे नेताना ग्रामस्थांना अत्यंत गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागल्याची घटना त्यांनी निवेदनात नमूद केली आहे. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने जंगलातून मृतदेह घेऊन जाताना दोन-दोन व्यक्तींना तो उचलून न्यावा लागला. याचवेळी गांजील माशा पिसाळल्याने घाबरलेल्या ग्रामस्थांना मृतदेह खाली ठेवून जीवाच्या आकांताने घराकडे धाव घ्यावी लागल्याचे सुतार यांनी म्हटले आहे.
ग्रामस्थांच्या जीवनातील शेवटचा प्रवासदेखील सुरक्षित आणि सुलभ नसावा, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे सांगत या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवूनही अद्याप रस्त्याचा प्रश्न सुटलेला नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे विजय सुतार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता कोतापूर ग्रामपंचायतीसमोर आपण आणि काही ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी निवेदनातून जाहीर केले आहे. या संदर्भातील निवेदन राजापूर तहसील कार्यालय, राजापूर पंचायत समिती तसेच रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहे. त्यामुळे कोतापूर घुमेवाडी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रलंबित प्रश्न प्रशासन आता कशा पद्धतीने मार्गी लावणार, याकडे कोतापूर परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

.jpeg)

0 टिप्पण्या