मुंबई, ४ ऑगस्ट २०२६ : संत झेवियर्स महाविद्यालयाचा बहुचर्चित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव ‘मल्हार २०२६’ यंदा १३, १४ आणि १५ ऑगस्ट रोजी होणार असून, त्याच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेला ‘मल्हार बाय द बे’ हा कार्यक्रम लोअर परळ येथील AntiSOCIAL येथे उत्साहात पार पडला. २०० हून अधिक संगीतप्रेमी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावत संपूर्ण वातावरण उत्साहाने भरून टाकले. संगीत आणि उत्साहाने भरलेल्या या संध्याकाळीला Furtados Music आणि JioSaavn यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात १५ बँड्सच्या दमदार सादरीकरणांनी झाली. रॉक, इंडी, पॉप आणि फ्युजन अशा विविध संगीतप्रकारांनी उपस्थितांना सुरुवातीपासूनच खिळवून ठेवले. यंदाच्या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण ठरले समद आणि भारत तसेच इंडियन R&B कलाकार श्रीया राव यांची सादरीकरणे, ज्यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर सादर झालेल्या फ्लॅश मॉब आणि डीजे ने कार्यक्रमात आणखी रंगत आणली.
‘मल्हार बाय द बे’ ने आगामी ‘मल्हार २०२६’ ची उत्सुकता आणखी वाढवली. संगीत, कला आणि उत्साहाची ही झलक अनुभवलेल्या उपस्थितांचे लक्ष आता १३, १४ आणि १५ ऑगस्ट रोजी संत झेवियर्स महाविद्यालयात रंगणाऱ्या तीन दिवसांच्या बहुप्रतिष्ठित महोत्सवाकडे लागले असून, यंदाचा मल्हार आणखी संस्मरणीय ठरणार, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

0 टिप्पण्या