चंदन कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कविसंमेलन संपन्न

 




     महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक शाहीर कालकथित कुंदन कांबळे यांचं हार्ट अटॅकने ३१ मे २०१७ रोजी निधन झाले. हे सांगण्याचे कारण, ह्या शाहीराचा चिरंजीव चंदन याचंही निधन हार्ट अटॅक मुळे वयाच्या ४८ व्या वर्षी ८ सप्टेंबर २०२४ रोजी झाले. यंदा चंदन कांबळे यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विक्रोळी, मुंबई येथील रत्नबोधी बुद्ध विहारात त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. 

     कविसंमेलनाची सुरूवात ज्येष्ठ कवी किरण सोनवणे यांच्या कवितेने करण्यात आली. माणूस गेल्यावर वेदना होतात. कुटुंबाला मित्रांना नातेवाईकांना वेदना होतात. परंतु ज्यांचा जीवनसाथी गेला त्याला होणारी वेदना.. वेदना कायमसोबत असते...स्मरणात. ही वेदना त्यांनी कवितेत मांडली.' वेदना ज्याच्या त्यालाच होती,ज्याचा गेलाय जीवनसाथी '

जीवन हे क्षणभंगुर आहे. व्यसनमुक्तीचा संदेश देणारी कविता 'क्षणभंगुर' वसंत हिरे यांनी सादर केली. 'क्षणभंगुर जीवन हे आपुले नका घालवू वाया रे.'

    कुंदन कांबळे यांचा  सहवास लाभलेला,

ज्यांचा कुंदन कांबळे कुटुंबा सोबत मैत्री संबंध आजही आहेत असे, ज्येष्ठ कवी के.पुरूषोत्तम यांनी ' परिवर्तन ' कविता सादर केली...' थांब मित्रा थांब झेंडावंदन करून येतो.'

    शाहीर कुंदन कांबळे यांना पाच मुली व एक मुलगा. त्यांचा मुलगा चंदन हा तबला, ढोलक, ढोलकी, ड्रमसेट, ऑक्टोपॅड, कोंगो  वाद्ये वाजवायचा.

चंदन यांच्या बहिणी नंदिनी संखे , अंजली जाधव यांनी एकुलता एक भाऊ चंदन यांच्या वर कविता लिहून, सादर करून भावाच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त  भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले.. उपस्थितांना ते जाणवत होते. नंदिनी यांनी ह्या प्रेमळ भावाविषयी.. कर्तृत्वाचा आलेख कवितेतून मांडला. ' कांबळे घराण्याच्या आम्ही पाच बहिणी.... लाखात एक आमचा दादा गुणी... असा कसा गेला सोडूनि.'

     अंजली जाधव म्हणाल्या ,चंदन ला जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्यांनीही त्यांच्या ' दादा 'विषयी च्या आठवणींना उजाळा दिला. 'चंदन' कविता सादर करून...

चंदेरी स्वप्न होते अनेक तुझ्या मनात 

दमला नाही कधी तबला ढोलकी वाजवण्यात

नकळतच सारे घडून गेले तुझ्या आयुष्यात 

त्यांच्या कवितेनं वातावरण भारावून गेले.

     सुप्रसिद्ध शाहीर कालकथित कुंदन कांबळे यांचा व त्यांच्या कुटुंबीयांच्या जवळचा, सर्वाधिक सहवास लाभलेला कवी उमेश जाधव यांनी कुटुंबाला झालेल्या वेदना,दु:ख, खंत आणि चंदनच्या जाण्याने काय झालं. असा स्वतः ला प्रश्न विचारून व्यक्त झाला. 

कवी उमेश जाधव व्यक्त होतात.

ढोलकही शांत झाला 

गप्प ढोलकी राहिली

आला हुंदका दाटून 

श्रध्दांजली ही वाहिली

दुःख उमेश भावानं सांगावं 

कुणापाशी...

चंदन दादा विषयी कविता  सादर करताना उमेश च्या डोळ्यात अश्रू वाहत होते. आणि उपस्थित कवी, कुटुंब व नातलग यांचेही डोळे भरले. गहिवरून आले. कवितचं इतकं छान मांडणी आणि

सादरीकरण करुन चंदनला उमेश यांनी काव्यातून आदरांजली वाहिली.

    चंदन च्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.नाना खैरे यांच्या कवितेत ती दिसून आली.सुप्रसिद्ध शाहीर कुंदन कांबळे गेले.त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार आयुष्यभर केला.

      शाहीर कुंदन कांबळे यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्यांच्या मित्रांपैकी मी देखील आहे...सुभाष आढाव. मला त्यांची मुलगी नंदिनी यांनी कवी संमेलनात कविता सादर करण्यासाठी निमंत्रित केले होते.' बाबासाहेब ' कवितेचे शीर्षक असलेली सुभाष आढाव यांनी कविता सादर केली. त्या कवितेतील ओळी..

येथे आहेत माझ्या

'पूर्वजांच्या स्मृतीं अन्

माझ्या पूर्वजांच्या पाऊलखुणा

तेथे लावतो एक दीवा

तेथे झुकतो माझा माथा '     शाहीर बाळासाहेब जोंधळे माझ्या शेजारी बाजूला खुर्चीत बसले होते. त्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी बसल्या ठिकाणी कागदावर कविता लिहून काढली व सादर केली. अत्यंत सुंदर सादरीकरण होतं.कुटुंबाची कुटुंब प्रमुख काळजी कशी घेतो. हे त्यांनी कवितेत मांडले..'कुटुंब तुमच्या विना पोरके झाले असं कसं हे झाले.'

   कवी प्रतिक कांबळे यांनी ' बाप ' शीर्षक असलेली कविता सादर केली. 

      गायक दिगंबर शिरसाट  म्हणाले, अनेक कार्यक्रमात शाहीर कुंदन कांबळे आणि आम्ही सोबत होतो. त्यांना कवी रंगराज ढेंगळे यांनी कुंदन, चंदन विषयी गाणं लिहून दिले. तेच गाणं गायक दिगंबर शिरसाट यांनी सादर केले.' कुंदन, चंदन ह्या बापलेकाने कलेची सेवा केली. खूपच मार्मिक शब्दांत गीतातून त्यांनी आदरांजली वाहिली.' आठवण तयाची येईल मजला ही गाता गाता '

     गायक भिवा गायकवाड यांनीही गीत सादर केले.

     कवी, बौद्धाचार्य प्रभाकर रामराजे यांनी कवी संमेलनाचे  सूत्रसंचालन केले व कविता सादर केली.' 'वेदना मनाच्या सागू कुणा,

संचिताचा आधार गेला 

हिचा संसार झाला सुना'

कालकथित चंदन कुंदन कांबळे कुटुंबाच्या वतीने उपस्थित सर्व कवींना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्वांना स्नेह भोजन देण्यात आले.  कार्यक्रमाचं आभार कांबळे कुटुंबाच्या वतीने कालकथित कुंदन कांबळे यांचे जावई संतोष गंगाराम धोत्रे यांनी मानले. 

   सदरहू कार्यक्रमाचा मी वृत्तांत लेख  लिहित असताना (सुभाष आढाव) नमूद करू इच्छितो , कवी कुंदन कांबळे यांच्या गीतातील ओळी...' बुध्दाच्या धम्मामध्ये समतेचं पीक येतं. प्रज्ञा शील करुणेनं जीवनाचं सोनं होतं. ' जीवनाचं सोनं व्हावं आणि समतेचे पीक येत रहावे. ह्या अपेक्षेने व सामाजिक बांधिलकी म्हणून कांबळे कुटुंबाच्या वतीने चंदन कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त  कविसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 



      सुभाष राघू आढाव,गोवंडी, मुंबई 

    मो. ७४९९४१३०८६

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या